लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खरेदी केलेल्या आल्याचे पैसे मागितल्यामुळे गुंडांनी एका भाजी विक्रेत्याला जखमी करून त्याच्या साथीदाराचा खून केला. ही धक्कादायक घटना बुधवारी रात्री नंदनवन येथील राजेंद्रनगर चौकाजवळ घडली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी रात्री एका आरोपीस अटक केली. अक्षय करोदे रा. नंदनवन झोपडपट्टी असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचे दोन साथीदार फरार आहेत. मो. इमरान मो. रियाज (२२) रा. हसनबाग कब्रस्तान असे मृताचे नाव आहे तर मो. आरिफ मो. सईद (२५) रा. खरबी असे जखमीचे नाव आहे.मो. आरिफ हा राजेंद्रनगर चौकात भाजी विकतो. नंदनवन पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर राजेंद्रनगर चौक आहे. आरिफ तिथे हातठेल्यावर भाजी विक्रीचा व्यवसाय करतो. बुधवारी रात्री ८.१५ वाजता आरिफसोबत त्याचा मित्र मो. इमरानसुद्धा उभा होता. त्याचवेळी नंदनवन झोपडपट्टीतील गुन्हेगार अक्षय करोदे आपल्या दोन साथीदारासह दुचाकीवर आला. त्यांनी आरिफकडून आले खरेदी केले. आले दुचाकीच्या डिक्कीत ठेवून ते जाऊ लागले. तेव्हा आरिफने त्यांना पैसे मागितले. यामुळे तिघेही संतापले. त्यांनी शिवीगाळ करीत आरिफवर हल्ला केला. त्याच्यावर चाकूने वार करून जखमी केले आणि दुचाकीवर स्वार होऊन जाऊ लागले. त्याचवेळी इमरान आरोपीच्या दिशेने धावला. त्याने आरोपींनी पैसे का देत नाही म्हणून जाब विचारला. तोपर्यंत आरोपी हातठेल्यापासून थोडे दूर निघून गेले होते. इमरानचे म्हणणे ऐकून ते परत आले. त्यांनी त्याच्यावरही शस्त्राने वार केले. त्याला जागीच ठार करून फरार झाले. भरचौकात ही घटना घडल्याने लोकांमध्ये खळबळ उडाली. इमरानला मेडिकलमध्ये पोहोचवण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती होताच नंदनवन पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी रात्री उशिरा अक्षयला ताब्यात घेतले. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे
तीन तासात तीन खूनसदरमधील गोंडवाना चौकात प्रॉपर्टी डीलर ऋषी खोसला (५०) यांचा खून करण्यात आल्याची घटना रात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. याची माहिती नागरिकांना मिळताच नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेतली. त्यापूर्वी दिघोरी येथील सेनापतीनगरात विक्की विजय दहाट (३२) या तरुणाची रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती.