लाेकमत न्यूज नेटवर्क
पिपळा (डाकबंगला) : घरात शिरून बांधकाम कामगाराच्या छाती व डाेक्यावर टिकासने वार करीत त्याचा खून करण्यात आला. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपळा (डाकबंगला) येथे बुधवारी (दि. ९) मध्यरात्री घडली असून, गुरुवारी (दि. १०) सकाळी उघडकीस आली. त्याचा खून कुणी व का केला, हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.
संतोष गोकुलनाथ सोळंकी (५५, रा. पिपळा-डाकबंगला, ता. सावनेर) असे मृताचे नाव आहे. संताेषचे पिपळा (डाकबंगला) येथील रेल्वेस्थानकाजवळ घर असून, तो बांधकाम कामगार म्हणून काम करीत उपजीविका करायचा. ता. रात्री घरी एकटाच असल्याने अज्ञात आराेपीने त्याच्या घरात प्रवेश करीत त्याच्या छाती व डाेक्यावर टिकासने वार केले. तो गतप्राण हाेताच आराेपीने घटनास्थळाहून पळ काढला.
दरम्यान, त्याचा शेजारी बळीराम शेंडे गुरुवारी सकाळी त्याला बाेलवायला त्याच्या घरी गेला असता, दारालगत विटांचे तुकडे दिसले. त्याला चाेरीचा संशय आल्याने त्याने दार उघडून आत बघितले असता, त्याला संताेष रक्ताच्या थाराेळ्यात पडला असल्याचे दिसले. त्यामुळे बळीरामने लगेच शेजाऱ्यांसह पाेलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच ठाणेदार पुंडलिक भटकर यांनी घटनास्थळ गाठले. शिवाय, पाेलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पाेलीस अधीक्षक राहुल माखनीकर, उपविभागीय पाेलीस अधिकारी मुख्तार बागवान तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पाेलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. श्वास पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले हाेते. पाेलिसांनी मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी नागपूर शहरातील मेयाे रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी भादंवि ३०२, ४५२ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक अभिषेक अंधारे करीत आहेत.
...
दारूचे व्यसन
काैटुंबिक वादामुळे संताेषची पत्नी दाेन मुली व मुलाला घेऊन माहेरी गेली हाेती. त्यामुळे तो तीन महिन्यांपासून घरी एकटाच राहात हाेता. संताेषला दारूचे व्यसन हाेते. त्यातच तो काविळने आजारी हाेता. त्यावर गावरान उपाय करीत हाेता. एकटेपणाचा फायदा घेत आराेपींनी त्याच्या खून केला. त्याचा खून नेमका कुणी व कशसाठी केला, या दिशेने पाेलीस तपास करीत असून, आराेपींना हुडकून काढण्यात लवकरच यश येणार असल्याचा विश्वास पाेलिसांनी व्यक्त केला.