लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (खापरखेडा ): पैशाच्या वाटाघाटीतून झालेल्या वादात खापरखेडा परिसरात राहणाऱ्या एका सराईत गुंडाची गळा चिरून हत्या करण्यात आली. अश्विन ढोणे (रा. वाॅर्ड क्रमांक ४, खापरखेडा) असे मृताचे नाव आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास शिवराम नगर, चनकापूर येथे घडली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अश्विन ढोणे आणि या प्रकरणातील संशयित शुभम पाटील हे दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. अश्विनवर खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण, अवैध कट्टा बाळगणे व वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत तर शुभम पाटीलवरही चोरीचे गुन्हे दाखल आहेत. शुभम याने काहीतरी प्रकरण करून ४ ते ५ लाख रुपये आणले असल्याची माहिती अश्विनला मिळाली होती. तेव्हापासून अश्विन हा शुभम आणि त्याच्या साथीदारांना त्यात वाटा मागत ब्लॅकमेल करीत होता. तीन दिवसांपूर्वी अश्विनने शुभमच्या साथीदारास पैशाची मागणी करून चाकू दाखवीत शुभम व त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. अश्विन आपला गेम करेल, अशी भीती दोघांना होती. त्यामुळे त्यांनी अश्विनचा काटा काढण्याचे ठरविले. दोघांनी अश्विनला वाटाघाटी करण्यासाठी शिवराम नगर येथील पडीत शेतात बोलावले. सायंकाळी अंधाराची वेळ असल्याने घटनास्थळावर आरोपी व मृत यांच्या व्यतिरिक्त कुणीही नव्हते. तिघेही तिथे दारू प्यायले असावे असा अंदाज घटनास्थळावर असलेल्या दारूच्या बाटल्यांवरून व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर नियोजितरीत्या अश्विनला पकडून त्याचा गळा चिरण्यात आला व शरीरावरही चाकूने घाव मारण्यात आले. अश्विन मृत झाल्याची खात्री पटल्यावर आरोपी तेथून पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून चाकू, एक दुचाकी वाहन व दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आला. आरोपीच्या शोधासाठी खापरखेडा पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचे पथक तयार करण्यात आले असून शोधमोहीम सुरु करण्यात आली आहे.