अनैतिक संबंधातून खून, पत्नी, प्रियकराची जन्मठेप कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2021 08:46 PM2021-10-08T20:46:13+5:302021-10-08T20:46:39+5:30
Nagpur News अनैतिक संबंधात बाधा निर्माण करणाऱ्या पतीला ठार मारणारी पत्नी रंजना रमेश बानेवार (३०, रा. बिडगाव) व तिचा प्रियकर अमोल ढाकूसिंग राठोड (३८, रा. पारडी) यांची जन्मठेप आणि इतर शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे.
नागपूर : अनैतिक संबंधात बाधा निर्माण करणाऱ्या पतीला ठार मारणारी पत्नी रंजना रमेश बानेवार (३०, रा. बिडगाव) व तिचा प्रियकर अमोल ढाकूसिंग राठोड (३८, रा. पारडी) यांची जन्मठेप आणि इतर शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे. हे नंदनवनमधील बहुचर्चित प्रकरण आहे.
रंजनाचे अमोलसोबत अनैतिक संबंध होते. त्यामुळे पती रमेश तिला अमोलसोबतचे संबंध तोडण्यासाठी वारंवार समजावत होता. परंतु, रंजना अमोलच्या प्रेमात आंधळी झाली होती. एक मुलगी व एक मुलगा असतानाही ती माघार घेत नव्हती. त्यामुळे रमेश व रंजनाचे रोज भांडण होत होते. त्यावेळी रंजना रमेशला ठार मारण्याची धमकी देत होती.
दरम्यान, रंजना व अमोलने १५ सप्टेंबर २०१५ रोजी रमेशला त्याच्याच घरी गळा आवळून ठार मारले. त्यानंतर, रमेशचा मृतदेह घरातच खड्डा खणून पुरला. त्यावर सिमेंटचे फ्लोरिंगही केले. रमेश दोन-तीन दिवस परिसरात दिसला नाही. त्यामुळे शेजाऱ्यांना त्याचे काहीतरी वाईट झाल्याचा संशय आला होता. त्यातच, १९ सप्टेंबर रोजी रमेशच्या घरातून दुर्गंधी यायला लागली. परिणामी, शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावले. कुलूप उघडून घरात प्रवेश केल्यानंतर नवीन फ्लोरिंगमधून खूप जास्त दुर्गंध येत होता. फ्लोरिंग खोदले असता त्याखाली रमेशचा मृतदेह आढळून आला. शेजाऱ्यांच्या बयानातून मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी रंजना व अमोलला अटक केली. त्यानंतर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.
ठोस पुरावे आढळले
१६ फेब्रुवारी २०१७ रोजी सत्र न्यायालयाने दाेन्ही आरोपींना जन्मठेपेची कमाल शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. त्यावर न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांच्यासमक्ष अंतिम सुनावणी झाली. त्यानंतर उच्च न्यायालयाने रेकॉर्डवरील ठोस पुरावे लक्षात घेता आरोपींचे अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.