लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : शेतात काम करणाऱ्या मजुराचा फाॅर्म हाऊसमध्ये खून करण्यात आल्याची घटना कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील मांगली शिवारात साेमवारी (दि. २१) सकाळी उघडकीस आली. त्याचा खून त्याच्याकडे असलेली रक्कम लुटण्यावरून करण्यात आला असावा, असा संशय पाेलिसांनी व्यक्त केला असून, संशयितास ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पाेलीस निरीक्षक चंद्रकांत मदने यांनी दिली.
नरेश दशरथ करूटकर (३७, रा. फेगड, ता. कुही) असे मृताचे नाव आहे. ॲड. ज्ञानेश्वर फुले, रा. नागपूर यांची मांगली (ता. कुही) शिवारात २७ एकर शेती आहे. नरेश त्यांच्याकडे मजुरीने शेतीची कामे व रखवाली करायचा आणि ११ मेपासून फाॅर्म हाऊसमध्येच राहायचा. अविनाश नावाचा तरुण ॲड. फुले यांच्याकडे ट्रॅक्टरचालक म्हणून काम करायचा. त्याने १ जूनपासून काम साेडले हाेते. दाेघेही एकमेकांना ओळखत असल्याने त्यांच्या अधूनमधून भेटी व्हायच्या.
ॲड. फुले यांनी नरेशसाेबत सतत चार दिवस फाेनवर संपर्क सांधण्याचा प्रयत्न केला. संपर्क हाेत नसल्याने ते स्वत: रविवारी (दि. २०) सायंकाळी शेतात आले. त्यावेळी त्यांना नरेशचा मृतदेह फार्म हाऊसमध्ये रक्ताच्या थाराेळ्यात पडला असल्याचे तसेच फरशीवरील रक्त सुकले असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी पाेलिसांना सूचना दिली.
माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून नरेशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कुही येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. या प्रकरणात आराेपींची संख्या एकापेक्षा अधिक असून, सध्या अविनाशला ताब्यात घेण्यात आले आहे. शिवाय, अन्य दिशेनेही तपास केला जात आहे, अशी माहिती पाेलीस निरीक्षक चंद्रकांत मदने यांनी दिली. याप्रकरणी कुही पाेलिसांनी भादंवि ३०२ अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.
...
धारदार वस्तूने वार
ॲड. फुले गुरुवारी (दि. १७) शेतात गेले असता, त्यांनी नरेशला मजुरांची मजुरी देण्यासाठी ५१ हजार रुपये दिले हाेते. त्याच रात्री अविनाश फार्म हाऊसवर आला हाेता. शेतमालक शेतात कधी येतात, कधी परत जातात, ते नरेशकडे पैसे ठेवून जातात, याबाबत अविनाशला माहिती हाेती. त्याने रक्कम लुटण्याच्या दृष्टीने धारदार वस्तूने नरेशवर वार करून त्याचा खून केला आणि तिथून पळ काढला असावा, अशी शक्यताही पाेलिसांनी व्यक्त केली आहे.