लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वत:चा मुलगा, बहीण, भाची, जावई आणि त्यांची आई अशा पाच जणांची निर्घृण हत्या करणारा क्रूरकर्मा विवेक गुलाब पालटकर याला ३० जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.नंदनवनमधील आराधनानगरात राहणारे कमलाकर पवनकर यांच्या घरात शिरून ११ जूनच्या पहाटे ३ च्या सुमारास क्रूरकर्मा पालटकरने जावई कमलाकर, बहीण अर्चना पवनकर, भाची वेदांती, कमलाकरची आई मीराबाई तसेच स्वत:चा पाच वर्षांचा मुलगा कृष्णा पालटकर याची लोखंडी सब्बलचे फटके मारून निर्घृण हत्या केली होती. हे हत्याकांड घडवून आणल्यानंतर आरोपी दिल्लीला पळाला. तेथून तो लुधियानाला पोहचला. तेथे एका बिहारी मजुराच्या माध्यमातून त्याने सैनीवाल भागातील इंडस्ट्री परिसरातील एका कंपनीत काम धरले. बाजूलाच एका चाळीत तो भाड्याच्या खोलीत राहू लागला. गुरुवारी त्याला गुन्हे शाखेच्या पथकाने लुधियानात जेरबंद केले. तेथून त्याला शुक्रवारी सायंकाळी नागपुरात आणले. आज शनिवारी त्याला न्या. जी. सी. फुलझलके यांच्या न्यायालयात तपास अधिकारी पोलीस निरीक्षक मुकुंद साळुंके यांनी हजर केले. मुख्य जिल्हा सरकारी वकील अॅड. नितीन तेलगोटे यांनी आरोपी पालटकर याने एकापेक्षा जास्त हत्यारांचा वापर करून मृतांचे डोके छिन्नविछिन्न केले. त्यामुळे ते हत्यार कोणते, त्याचा शोध घ्यायचा आहे. आरोपी वर्षभरापूर्वी कारागृहातून बाहेर आला, या कालावधीत तो कुठे कुठे वास्तव्याला होता, ते शोधायचे आहे. हत्या करताना आरोपीने जी क्रूरता दाखवली ती कोणत्या कारणामुळे, त्याची माहिती मिळवायची आहे. हा गुन्हा करण्यासाठी आरोपीला कुणी चिथावणी दिली काय किंवा त्याचा कुणी साथीदार आहे काय, त्याची माहिती मिळवायची आहे, असे मुद्दे न्या. फुलझलके यांच्यासमोर मांडले. त्याचा २ जुलैपर्यंत पीसीआर मिळावा, अशी विनंती केली. न्यायालयाने आरोपीला ३० जूनपर्यंत पीसीआर मंजूर केला.---आरोपीला वकील मिळाला नाहीया हत्याकांडाने केवळ पवनकर कुटुंबीयच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांच्याही भावना तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे आरोपीच्या बाजूने आज कोणत्याच वकिलाने न्यायालयात बाजू मांडली नाही. आरोपीला न्यायालयात हजर करताना अनुचित घटना घडू शकते, हे ध्यानात घेत पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली होती.