लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोराडीतील सुरादेवी येथे एका युवकाची हत्या करून मृतदेहाला आग लावण्यात आली. मंगळवारी घडलेला हा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला.सुरादेवी परिसरात एक सिमेंट फॅक्टरी आहे. जवळच एक निर्जन स्थळ आहे. बुधवारी सकाळी ८ वाजता परिसरातील काही युवक तिथे फिरत होते. त्यांना पहाडाजवळ धूर निघताना दिसून आला. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता अर्धजळालेला मृतदेह आढळला. त्यांनी सुरादेवीचे सरपंच सुनील दुधपाचारे यांना घटनेची माहिती दिली. सुनील यांनी कोराडी पोलिसांना सूचना दिली. ठाणेदार गणेश ठाकरे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनस्थळी पोहोचले. पोलिसांनी वस्तीतील नागरिकांच्या मदतीने मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. परंतु कुठलीही माहिती मिळू शकली नाही. मृतदेह मेयो रुग्णालयात पाठवण्यात आला.मृत २५ ते ३० वर्ष वयोगटातील असल्याचे सांगितले जाते. त्याच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसून येते. मृतदेह पोत्यामध्ये ठेवला होता. त्यामुळे असा संशय आहे की, युवकाची दुसऱ्या ठिकाणी हत्या करून त्याचा मृतदेह पोत्यात भरून येथे आणला असावा. नंतर पेट्रोल किंवा डिझेल टाकून आग लावण्यात आली. परंतु तो पूर्ण जळाला नाही. मृतदेह पाहून बुधवारी अगदी पहाटे ही घटना घडली असावी, असा संशय आहे. मृतदेहाची ओळख लपविण्यासाठीच मृतदेहाला आग लावण्यात आली असून आरोपींना या परिसराची पूर्ण माहिती असावी, असा पोलिसांना संशय आहे.सूत्रानुसार घटनास्थळ परिसरात नेहमीच बाहेरची तरुण जोडपी येत-जात असतात. रात्रीच्या वेळी सुद्धा याचे प्रमाण अधिक असते. पोलिसांसाठी सुद्धा ते डोकेदुखी बनले आहेत. पोलीस अशा जोडप्यांना नेहमीच हाकलून लावत असतात. रविवारीच कोराडी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीला तीन युवकासह कारमध्ये संशयास्पद अवस्थेत पकडले होते. अशा कारणातूनही युवकाची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.नोव्हेंबर २०१७ मध्ये लॉटरी व्यापारी राहुल आग्रेकर याचे सुद्धा अशाच पद्धतीने अपहरण करून नंतर हत्या करण्यात आली होती. पुरावे नष्ट करण्यासाठी राहुलच्या मृतदेहाला बुटीबोरीजवळ आग लावण्यात आली होती. ताज्या घटनेमुळेही पोलीस हादरले आहे. ते बेपत्ता युवकाच्या माहितीच्या आधारावर मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहेत.ग्रामीण आणि दुसऱ्या जिल्ह्यातील पोलिसांनाही याबाबत सूचना देण्यात आली आहे. पोलीस श्वानाच्या मदतीने आरोपीचा शोध घेत आहेत. घटनास्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फूटेज तपासले जात आहेत.