लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भिकारी म्हणून चिडवून भाजीपुरी खायला दिल्याने संतापलेल्या एका आरोपीने त्याच्यासोबत काम करणाऱ्या दोघांवर हातोड्याने हल्ला चढवला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल आहे. लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी पहाटे ही थरारक घटना घडली. यानंतर आरोपी स्वत: रक्ताने भरलेला हातोडा घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचला.विनोद सिताराम मोखे (वय ४०) असे आरोपीचे नाव आहे. तो शांतीनगरातील लालगंज परिसरातील रहिवासी आहे. आरोपी विनोद मोखे आणि कालू उर्फ लालचंद देविदास मेंढे (वय ४०) तसेच कंडक्टर नामक एक असे तिघे लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जे के टॉवर इमारतीच्या जवळ असलेल्या भागात हमाली करत होते. या भागात अनेक व्यापाऱ्यांचे वेगवेगळे गोदाम आहेत. तेथे ट्रक मधून येणारा माल खाली करणे आणि भरणे, असे काम करण्यासाठी सकाळपासून रात्री पहाटेपर्यंत मजुरांची मोठी गर्दी असते. त्यातले अनेक जण तेथेच मिळेल ते खातात आणि त्याच भागात झोपतात. शनिवारी रात्री या भागात नेहमी प्रमाणे मजुरांची गर्दी होती. सेवाभावी व्यक्तींनी त्यांच्यासाठी जेवण आणले. तेथील मजुरांना पुरीभाजीचे जेवण वाटप केल्यानंतर ते निघून गेले. यावेळी आरोपी विनोद मोखे उशिरा आल्यामुळे त्याला पुरी मिळाली नाही. बाजूलाच लालचंद मेंढे आणि कंडक्टर पुरी भाजी खात असल्याचे पाहून विनोदने त्या दोघांना पुरी मागितली. त्याने पुरीसाठी हट्ट धरल्याचे पाहून लालचंद आणि कंडक्टर या दोघांनी त्याला पुरी खायला देताना, ' ले भिकारी, पुरी खा' असे म्हटले. त्यावरून या तिघांमध्ये वाद झाला. आरोपी आणि सोबतच्या मजुरांमध्ये हाणामारी होत असल्याचे पाहून अनेकांनी धाव घेतली. त्यांना दूर केले. त्यानंतर आरोपीसह दोन-तीन जण लकडगंज ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी त्यांना समज देऊन एनसीची कारवाई केली आणि पुन्हा भांडण करायचे नाही, असे सांगून परत पाठविले. रविवारी पहाटे ३ च्या सुमारास आरोपी विनोद मोखे रक्ताने माखलेला हातोडा घेऊन लकडगंज पोलिस ठाण्यात पोहोचला. त्याच्या कपड्यांवर रक्ताच्या चिरकांड्या दिसत असल्याने काहीतरी आक्रीत घडल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी त्याला विचारपूस केली असता आपण दोघांचा गेम केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. त्यामुळे पोलिसांनी लगेच त्याला वाहनात बसून घटनास्थळी नेले. तेथे लालचंद आणि कंडक्टर हे दोघे रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसले. काही अंतरावर मोठ्या संख्येत अन्य मजूर झोपून होते. पोलिसांनी निपचित पडून असलेल्या लालचंद तसेच कंडक्टर या दोघांना उचलून रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी लालचंदला मृत घोषित केले. कंडक्टरची अवस्था चिंताजनक असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.त्यांना थांगपत्ताही नव्हताआरोपी मोखे हमाली करतो आणि बाजूच्या एका गोदामात चौकीदारीही करतो. लालचंद आणि कंडक्टर गाढ झोपेत असल्याचे पाहून तो बाजूच्या गोदामात गेला. त्याने तेथून हातोडा आणला आणि त्या दोघांच्या डोक्यावर वार केले. किंकाळी ऐकून लालचंद आणि कंडक्टरच्या बाजुला झोपलेले पळून गेले. तर, आरोपी मोखे ठाण्यात पोहचला. दरम्यान, पोलिसांचे वाहन मजुरांच्या ठिय्यावर पोहोचल्यानंतर अनेक मजूर झोपेतून जागे झाले. त्यानंतर त्यांना येथे लालचंदची हत्या झाली आणि कंडक्टरही गंभीर जखमी असल्याचे कळाले.दिवसभर मोलमजुरी केल्यानंतर अनेक मजूर मोठ्या प्रमाणावर दारू पितात. त्यामुळे त्यांना आपल्या बाजूला काय घडले याची एकदा झोप लागल्यानंतर कल्पना नसते. रविवारी पहाटेचा प्रकारही तशातलाच असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, सोबत काम करणाऱ्यांची हत्या झाल्याचे कळल्यानंतर तेथून अनेक मजुरांनी पळ काढला. चरणसिंग उर्फ बहादूर ज्ञानसिंग कुलस्ते (वय ३८) यांची तक्रार नोंदवून घेत लकडगंज पोलिसांनी आरोपी विनोद मोखे याला एकाची हत्या करणे तसेच दुसऱ्याच्या हत्येचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून अटक केली. पुढील तपास सुरू आहे.