नागपूर : पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका सफाई कामगाराने तडीपार गुन्हेगाराची सहकाऱ्यांच्या मदतीने हत्या केली. रविवारी रात्री गणेशपेठ ठाण्यातील भालदारपुरा येथील स्वीपर कॉलनीत ही घटना घडली. विजय अंकुश तायवाडे (वय २२) असे मृतकाचे नाव आहे. तडीपार गुंडासह तीन आरोपांनी पोलिसांनी अटक केली असून, या प्रकारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
विजय हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. तो मूळचा खापरखेडा येथील असून, भाऊ, वहिनी व बहिणीसह आजी शशिकला यांच्या घरी रहायचा. याच परिसरात आरोपी अक्षय उर्फ पापा बक्सरे राहतो. विजयचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असून, ती त्याला आर्थिक मदत करत असल्याचा पापाला संशय होता. यामुळे विजय व पापामध्ये वाद होता. पापाने लकडगंज येथील तडीपार गुंड वाट्या उर्फ सूरज धापोडकर याला विजयच्या हत्येची सुपारी दिली. दोन दिवसांअगोदर सूरज आपल्या सहकाऱ्यांसह विजयच्या घरी आला होता. ऐनवेळी याची माहिती कळाल्यामुळे विजय जीव वाचवून पळण्यात यशस्वी झाला होता.
सोमवारी खापरखेडा येथे विजयच्या काकाच्या मुलाच्या लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम होता. यात सहभागी होण्यासाठी विजयचे कुटुंबीय खापरखेड्याला गेले होते. सायंकाळी ६ वाजता विजय आपल्या मित्रासह घरून रवाना झाला. रात्री दोन वाजता पापा व सूरज धापोडकर यांनी विजयला घेरले व त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचे शव घरात पलंगावर ठेवून फरार झाले. रात्री अडीच वाजता वस्तीतील लोकांना घटनेची माहिती मिळाली व त्यांनी गणेशपेठ पोलिसांना कळविले. पोलिसांनी विजयच्या कुटुंबीयांना नागपुरात बोलविले. कुटुंबीयांनी पापासोबतच्या वादाबाबत सांगितल्यावर पोलिसांनी सूत्रे हलविली व पापा, सूरज व अभय सातपुते यांना अटक केली.
तडीपार गुंड शहरात कसा?
सूरज धापोडकर हा तडीपार असूनदेखील शहरात उघडपणे फिरत होता. एक तडीपार गुंड सुपारी घेऊन शहराच्या दाटीवाटीच्या वस्तीत शिरून हत्या करतो, ही घटना यंत्रणेतील त्रुटींकडे अंगुलीनिर्देश करणारी आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.