नागपूर : शनिवारपासून बेपत्ता असलेल्या एक कामगाराची हत्या झाल्याने जयताळा बाजार परिसरात खळबळ उडाली. भोजराज रामेश्वर डोमडे (३०, शहाणे लेआउट) असे मृतकाचे नाव असून, पोलिसांनी चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेतले आहे.
भोजराज आमगावच्या वाढई नावाच्या ठेकेदाराकडे काम करायचा. तान्हा पोळ्याच्या दिवशी सकाळी ८ वाजता भोजराज डोमडे पत्नीला ठेकेदाराकडे कामाचे पैसे घेण्यास जातो, असे सांगून घरून निघाला. तो रात्रीपर्यंत घरीच न आल्याने त्याची पत्नी चिंतेत पडली व २८ ऑगस्ट रोजी सोनेगाव पोलीस ठाण्यात तो हरविल्याबाबत तक्रार दिली. सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयताळा बाजार चौकाजवळील गव्हर्नमेंट हाउसिंग सोसायटीच्या मोकळ्या मैदानात एका सिमेंटच्या पाइपमध्ये गादीत गुंडाळलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला. प्रतापनगर पोलिसांनी चौकशी केली असता सोनेगाव पोलीस ठाण्यात डोमडे याच्यासंदर्भात झालेल्या तक्रारीची माहिती कळाली. त्यानंतर चाचपणी केली असता तो मृतदेह डोमडे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या मानेवर व डोक्यावर प्रहार केल्याच्या जखमा होत्या.
सोनेगाव पोलिसांनी बेपत्ता असल्याच्या तक्रारीवरून ठेकेदाराला विचारणा केली होती. मात्र त्याने भोजराज त्याच्या गावी आलाच नसल्याचा दावा केला होता. मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी वाढई आणि त्याचा मित्राला ताब्यात घेतले. फोनच्या रेकॉर्ड्सवरून ठेकेदार नागपुरात असल्याचे पोलिसांना समजले. त्याने खोटी माहिती का दिली असे विचारले असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसांनी दोघांचीही चौकशी सुरू केली आहे.
दीड महिन्यापूर्वीच बदलले होते घर
भोजराज हा गोंदियातील आमगाव येथील रहिवासी होता. त्याच्या पश्चात पत्नी, पाच वर्षांचा मुलगा आणि तीन वर्षांची मुलगी असा परिवार आहे. दीड महिन्यांपूर्वी तो पन्नासे ले-आउटमध्ये राहायला आला होता.