जादूच्या संशयामुळे खून, आरोपीची जन्मठेप कायम - उच्च न्यायालय
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: June 1, 2023 01:59 PM2023-06-01T13:59:15+5:302023-06-01T13:59:33+5:30
वर्धा जिल्ह्यातील प्रकरण
नागपूर : काळी जादू करीत असल्याच्या संशयातून गावातील शेतमजुराचा खून करणाऱ्या आरोपीची जन्मठेप व इतर शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने कायम ठेवली. न्यायमूर्तिद्वय रोहित देव व उर्मिला जोशी यांनी हा निर्णय दिला. ही घटना वर्धा जिल्ह्यातील आहे.
हरी ऊर्फ हरीहर उदयभान वाघाडे (४२) असे आरोपीचे नाव असून तो खरांगना पोलिसांच्या क्षेत्रातील पुलाई येथील रहिवासी आहे. मृताचे नाव चंपतराव नागोसे होते. तो काळी जादू करतो, असा वाघाडेला संशय होता. त्यावरून घटनेच्या काही महिन्यांपूर्वी वाघाडेने नागोसेसोबत भांडण केले होते. पुढे १९ सप्टेंबर २०१७ रोजी सकाळी १० च्या सुमारास वाघाडेने नागोसेला आधी कुऱ्हाड मारून जखमी केले. त्यानंतर त्याचा गळा आवळून खून केला.
३० सप्टेंबर २०१९ रोजी सत्र न्यायालयाने वाघाडेला जन्मठेप व एक हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध त्याने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने रेकॉर्डवरील पुरावे लक्षात घेता ते अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. वाघाडेच्या कपड्यांवर नागोसेचे रक्त आढळून आले. त्यासंदर्भात वाघाडेला समाधानकारक स्पष्टीकरण देता आले नाही.