जादूटोणाच्या संशयातून खून, आरोपीची जन्मठेप कायम

By राकेश पांडुरंग घानोडे | Published: June 22, 2023 01:46 PM2023-06-22T13:46:20+5:302023-06-22T13:47:59+5:30

उच्च न्यायालय : गडचिरोली जिल्ह्यातील घटना

Murder on suspicion of witchcraft, life imprisonment of the accused | जादूटोणाच्या संशयातून खून, आरोपीची जन्मठेप कायम

जादूटोणाच्या संशयातून खून, आरोपीची जन्मठेप कायम

googlenewsNext

नागपूर : जादूटोणा करीत असल्याच्या संशयातून गावातील महिलेचा खून करणाऱ्या आरोपीची जन्मठेप व इतर शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने कायम ठेवली. ही घटना गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा पोलिसांच्या क्षेत्रामधील आहे.

नरेश श्रीराम उईके (४०) असे आरोपीचे नाव असून तो मोहगाव येथील रहिवासी आहे. १० डिसेंबर २०२० रोजी सत्र न्यायालयाने उईकेला खुनाच्या गुन्ह्यांतर्गत दोषी ठरवून जन्मठेप व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली. त्याविरुद्ध उईकेने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तिद्वय रोहित देव व उर्मिला जोशी यांनी रेकॉर्डवरील विविध ठोस पुरावे लक्षात घेता आरोपीचे अपील फेटाळून लावले.

मृताचे नाव सुमित्रा उईके होते. ती जादूटोणा करीत असल्याचा आरोपीला संशय होता. त्यातून आरोपीने १ ऑक्टोबर २०१९ रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास सुमित्राचा कुऱ्हाडीने वार करून खून केला. त्यावेळी सुमित्राची मैत्रिण घटनास्थळी हजर होती. काहीवेळाने सुमित्राचा पती घटनास्थळी गेला. आरोपी रक्ताने माखलेली कुऱ्हाड हातात पकडून सुमित्राच्या मृतदेहाजवळ उभा असलेला त्याला दिसला. तसेच, आरोपीच्या कपड्यांवर सुमित्राचे रक्त आढळून आले.

Web Title: Murder on suspicion of witchcraft, life imprisonment of the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.