लाेकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : बैलजाेडीच्या खरेदी-विक्री व्यवहारातून उद्भवलेला वाद विकाेपास गेला आणि त्यातून चाैघांनी एकास बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर त्याच्या डाेक्यावर वार केले आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याला विहिरीत टाकले. ही घटना नरखेड पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील खेडी (कर्यात) शिवारात गुरुवारी (दि.१३) सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली असून, बुधवारी (दि.१९) उघडकीस आली. या प्रकरणात चाैघांना अटक करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी दिली.
बाबाराव सूर्यभान परीपगार (५५, रा. खाेमली, ता. नरखेड) असे मृताचे नाव असून अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये शुभम बाबूराव जाधव (२५), वैभव सतीश जाधव (२५) दाेघेही रा. खेडी (कर्यात), ता. नरखेड, हेमराज गजानन बाभूळकर (४०) व उमेश किशन रेवतकर (३०) दाेघेही रा. तीनखेडा, ता. नरखेड या चाैघांचा समावेश आहे. शुभम व बाबाराव यांच्यात काही दिवसांपूर्वी बैल खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला हाेता. याच व्यवहारातून त्या दाेघांमध्ये वितुष्ट निर्माण झाले. त्यातच शुभमने बाबारावला संपविण्याचा निर्णय घेतला व याेजना तयार केली. त्याने बाबारावला गुरुवारी (दि.१३) सकाळी काही कामानिमित्त खेडी (कर्यात) येथे बाेेलावले. त्याच्या याेजनेबाबत पूर्वकल्पना नसल्यानेही बाबाराव या शिवारात त्याच्या सूचनेवरून आले.
या शिवारातील शेतात शुभमने बैल खरेदी-विक्रीतील वाद उकरून काढत बाबारावशी भांडायला व नंतर मारहाण करायला सुरुवात केली. यात शुभमसाेबतच हेमराज वैभव व उमेशनेही बाबारावला मारहाण करीत त्यांच्या डाेके, चेहरा व इतर ठिकाणी दगड, काठी च जड वस्तूने वार केले. यात ते गतप्राण हाेताच चाैघांनीही त्यांचा मृतदेह शेतातील विहिरीत टाकला व निघून गेले. याप्रकरणी नरखेड पाेलिसांनी भादंवि ३०२, ४०४, २०१, ३४ अन्वये गुन्हा नाेंदवून चाैघांनाही अटक केली. या घटनेचा तपास पाेलीस निरीक्षक जयपालसिंग गिरासे करीत आहेत.
....
अन् बिंग फुटले
बाबाराव घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी ते बेपत्ता असल्याची तक्रार नाेंदविली हाेती. त्यातच खेडी (कर्यात) शिवारातील विहिरीत मृतदेह आढळून आला. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर बाबाराव यांचा मुलगा सूरज परीपगार (२७, रा. खामली) याने व्यक्त केलेल्या संशयाच्या आधारे पाेलिसांनी शुभमला ताब्यात घेत विचारपूस केली. त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदारांची नावेही सांगितली. या हत्येचे बिंग फुटताच पाेलिसांनी शुभमसह त्याच्या अन्य साथीदारांस अटक केली.