लाेकमत न्यूज नेटवर्क
बडेगाव : जंगल परिसरात धारदार शस्त्राने वार करीत खून करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह खापा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बडेगाव-खेकरानाला मार्गावरील महारकुंड शिवारातील पुलाच्या पायलीत फेकण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी (दि. २१) सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आला. हा खून चार ते पाच दिवसांपूर्वी बाहेर करण्यात आला असावा, अशी शक्यता ठाणेदार अजय मानकर यांनी व्यक्त केली.
प्रदीप जनार्दन बागडे (४७, रा. अजनी, नागपूर) असे मृताचे नाव आहे. खेकरानाल्यामुळे या भागात पर्यटकांचा वावर वाढल्याने खापा-बडेगाव-खेकरानाला या मार्गावर सतत वर्दळ असते. दरम्यान, मंगळवारी सकाळी याच मार्गावरील महारकुंड शिवारातील पुलाखाली मृतदेह आढळून आल्याने नागरिकांनी लगेच पाेलिसांना सूचना दिली. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खापा येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात पाठविला.
खिशातील ओळखपत्रावरून मृताची लगेच ओळख पटली. हा मृतदेह पुलाच्या सिमेंटच्या पायलीत ठेवला हाेता. मात्र, या भागात वन्यप्राण्यांचा वावर करण्याने प्राण्यांनी ताे ओढत बाहेर आणला. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात वृत्त लिहिस्ताे कुणालाही चाैकशीसाठी ताब्यात घेण्यात आले नव्हते किंवा अटक करण्यात आली नव्हती. याप्रकरणी खापा पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास हेडकॉन्स्टेबल प्रमोद बन्सोड प पाेलीस शिपाई अंकुश चरपे करीत आहेत.
...
अवैध धंद्यात वाढ
हा परिसर मध्य प्रदेशच्या सीमालगत आहे. पर्यटकांची वर्दळ वाढल्याने या भागात धाब्यांची संख्याही बरीच आहे. संपूर्ण परिसरत जंगली असल्याने येथे जुगार खेळणे, दारू पार्टी करणे, अवैध दारूविक्री करणे यासह अन्य प्रकार वाढले आहे. याच भागातून दारूची अवैध वाहतूकही माेठ्या प्रमाणात केली जात असून, यात नागपूर शहरातील काही मंडळी गुंतली आहे. प्रदीप बागडे याचा खूनही याच अवैध धंद्यातून झाला असावा, अशी शक्यता ठाणेदार अजय मानकर यांनी व्यक्त केली आहे.
...
छातीवर वार
प्रदीपच्या छातीवर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खाेल जखमा आढळून आल्या आहेत. आराेपींनी त्याचा खून इतरत्र केला आणि पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह या भागात फेकला. या परिसरात वाहनांची २४ तास वर्दळ सुरू असते. त्यामुळे खापा पाेलिसांनी महत्त्वाच्या ठिकाणी चेकपाेस्ट तयार करून वाहनांची नियमित तपासणी करावी, अशी मागणी टेंभूरडाेह-महारकुंडचे सरपंच दीपक सहारे यांनी केली आहे.