नागपूर : एकनाथ निमगडे यांनीे १९८० मध्ये सिद्दीकी यांच्याशी त्यांच्या वर्धा रोडवरील साडेपाच एकर जमिनीचा सौदा केला होता. अनुपम यांच्यानुसार सिद्दीकीने बयाणा घेतल्यानंतर सौदा करण्यास नकार दिला होता. तेव्हापासून सिद्दीकी आणि एकनाथ यांच्यात न्यायालयात वाद सुरू आहे. या जमिनीची किंमत १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. पायोनियर समूहाचे मालक बिल्डर अनिल नायर यांची या वादातीत जमिनीच्या मागे जमीन होती. नायर यांनी या वादातीत जमिनीवरून डीपी रोड काढला होता. याविरुद्ध एकनाथ यांनी तक्रार केली होती. नायर यांनी एका नेत्याच्या माध्यमातून एकनाथला समजावण्याचा प्रयत्न केला होता. सिद्दीकीने बिल्डर आदित्य गुप्ता यांच्याशी सुद्धा जमिनीचा सौदा केला होता. गुप्ता यांनी ले-आऊट प्लान मंजुरीसाठी अर्ज केला होता. याचा विरोध केल्यामुळे सुद्धा एकनाथ यांना धमकावण्यात आले होते. अनुपमने पाच दिवसांपूर्वी सुद्धा एका व्यक्तीने गुप्ता यांच्याकडून धमकी दिली असल्याचे सांगितले आहे. सूत्रानुसार आरोपी गांधीबाग उद्यानातूनच एकनाथ यांचा पाठलाग करीत होता. त्याने अग्रसेन भवनाच्या मागच्या बाजूला त्याना रोखले. आवाज ऐकून एकनाथ यांनी आपली स्कुटी थांबवली. ते स्कुटीला स्टँडवर उभी करीत बोलू लागले, या दरम्यान आरोपीने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.एकनाथ हे कडक स्वभावाचे होते. दीड तास गांधीबाग उद्यानात घालवल्यानंतर ते पत्नी सोबत थेट घरी जायचे. व्यायामाने थकवा येत असल्याने ते कुठे थांबत नव्हते. गोळ्या झाडल्यानंतर खुनी तेथून गीतांजली टॉकीजच्या दिशेने जाऊ लागला. घटनास्थळापासून थोड्याच अंतरावर चौक आहे. येथून एक रोड सेंट्रल एव्हेन्यू आणि दुसरा खदान वस्तीच्या दिशेने जातो. खुनी हा सेंट्रल एव्हेन्यू किंवा गीतांजली टॉकीजच्या दिशेनेच गेल्याची शक्यता आहे. पोलिसांनी दोन्ही मार्गावरील सीसीटीव्ही पाहिले आहेत. परंतु तेथून कुठलाही पुरावा हाती लागलेला नाही. घटनास्थळ परिसरात अनेक संदिग्ध आणि गुन्हेगार राहतात. ते विविध गटांशी जुळलेले आहेत. पोलीस त्यांचीही विचारपूस करीत आहे. यामुळे स्थानिक गुन्हेगारही हादरले आहेत. अनुपमच्या माहितीच्या आधारावर पोलीस मंगळवारी दुपारपासूनच सिद्दीकी, अनिल नायर आणि आदित्य गुप्ता यांची विचारपूस करीत आहे. आदित्यचे वडील मुंबईला गेले होते. ते आज सकाळी नागपूरला पोहोचले. पोलिसांनी आज दिवसभर तिघांचीही आणि गुप्ता यांच्या वडिलांची विचारपूस केली. तिघांनीही या घटनेत आपला सहभाग असल्याचे स्पष्टपणे नाकारले आहे. (प्रतिनिधी)
हत्या जमिनीच्या वादातूनच
By admin | Published: September 08, 2016 2:24 AM