नागपूर : घराकडे पायी परतणाऱ्या तहसीन अन्सारी या मजूर युवकाला दुचाकीचा कट लागला. यावरून झालेल्या किरकोळ वादातून त्याचा खून कण्यात आला. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक पाचने या घटनेचा तपास करून सूत्रधार आरोपी रजा रियाज खान (२०) उंटखाना, आफताब अशफाक खान (२०), मनोज कुमार ऊर्फ करण जैतराम मंडई (२३), जुनी खलासी लाईन, कामठी यांना ताब्यात घेण्यात आले.
गरीबनवाज नगर येथे राहणारा मो. तहसीन मो. मुबीन अन्सारी (२३) या कामगार युवकाची १७ नोव्हेंबरच्या रात्री यशोधरा नगरमधील योगी अरविंद नगर पुलाजवळ पोटात चाकू भोसकून हत्या करण्यात आली होती. मृताचा मोबाईलही आरोपींनी नेला होता. तो आईवडिलांना एकुलता एक होता. त्याचे कुणासोबतही भांडण नव्हते. त्यामुळे पोलीसही संभ्रमात पडले होते. ४० सीसीटीव्ही फुटेज आणि ३५ आरोपींची चौकशी करूनही पोलिसांना कोणताही धागा गवसत नव्हता. सीसीटीव्ही फुटेजवरून एक आरोपी लाल रंगाच्या दुचाकीवर असल्याचे दिसले, याशिवाय कोणताही पुरावा नव्हता. तपासादरम्यान तहसीनच्या मोबाईलवरून एका युवकाला फोन करण्यात आल्याचे लक्षात आले. हा कॉल फक्त ५ सेकंदाचा होता. ‘रजा खान याला भेटावे’, एवढाच त्यात संदेश होता. यावरून पोलिसांना रजा खान याचा मोबाईल ताब्यात घेऊन चौकशी केली असता घटनेच्या वेळी तो यशोधरा नगरमध्ये होता, असे निदर्शनास आले, त्याच्याकडे लाल रंगाची दुचाकीही होती. यावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
रजाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, १७ नोव्हेंबरला त्याने दोन साथीदारांसह संत कबीर नगरातील संतोष सहानी याचा मोबाईल चोरला. त्यानंतर ते मोमिनपुरामध्ये पार्टी करण्यासाठी चालले असता योगी अरविंद नगरातील पुलाजवळ त्याच्या दुचाकीचा कट एका युवकाला लागला. यावरून बाचाबाची झाली. या वादात रजाने चाकू त्याच्या पोटात भोसकला. या दरम्यान त्याचा पडलेला मोबाईल घेऊन रजा साथीदारांसह पळून गेला.
२१ नोव्हेंबरला त्याने सहानीचे सीमकार्ड त्याच्या मोबाईलमध्ये टाकून आपल्या मित्राला धमकावण्यासाठी कॉल केला. मात्र त्याच्या या चुकीमुळे पोलिसांना पुरावा मिळाला आणि तो पोलिसांच्या हाती लागला. रजा हा अपराधी वृत्तीचा असून तो कामठीतील पोरवाल महाविद्यालयात द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. ही कारवाई डीसीपी गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय विनोद पाटील, एपीआय अमोल काचोरे, अनिल मेश्राम, पीएसआय ओमप्रकाश भलावी, प्रीती कुळमेथे आदींनी केली.