लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दारूचे दुकान चालविणाऱ्या एका आरोपीसोबत झालेल्या वादानंतर विरोधी टोळीतील गुंडांनी शेख इरफान अब्दुल रज्जाक अन्सारी (वय १९, रा. वनदेवीनगर) या तरुणाची तलवार आणि दगडांनी हल्ला चढवून हत्या केली. या हत्याकांडानंतर बुधवारी रात्री मृत तरुण आणि आरोपींच्या साथीदारांनी परस्परांवर सशस्त्र हल्ला चढवल्याने एकूण चार जण जखमी झाले. त्यातील विजू बारापात्रे (वय ३०) आणि अभिनव गोसावी (वय २३) एक दोघे गंभीर आहेत. कळमन्यातील गुलशननगरात घडलेल्या या घटनेमुळे त्या भागात बुधवारी मध्यरात्रीपासून प्रचंड तणाव निर्माण झाला. ते पाहता त्या भागात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.दिलीप पॉल या दारू दुकानदाराचा बुधवारी वाढदिवस होता. त्यामुळे दिवसभर त्याच्या वनदेवीनगरातील कार्यालयासमोर त्याच्या साथीदारांची वर्दळ होती. ते तेथे गोंधळ घालत होते. दुपारी ११.३० ते १२ च्या सुमारास जगदीश किराणा स्टोर्स जवळून शानू आणि तौकीर नामक तरुण दुचाकीने जात होते. गर्दीतील गोंधळामुळे शानूच्या दुचाकीचा एकाला धक्का लागला. त्यामुळे दिलीपच्या साथीदारांनी शानू आणि तौकीरला बेदम मारहाण केली. ही माहिती कळाल्याने इरफान तेथे पोहचला. आरोपींनी त्यालाही बेदम मारहाण करून पळवून लावले. इरफान या घटनेनंतर त्याच्या चौकीदारीच्या कामावर गेला. रात्री ११.३० ते १२ च्या वेळेस आरोपी गुंडांची टोळी तेथे पोहचली. त्यांनी इरफानला तेथून मारहाण करीत दिलीपच्या कार्यालयाजवळ आणले. तेथे तलवारीचे घाव घालून आरोपींनी इरफानला विटांनी ठेचले. इरफानला विरोधी गटातील गुंडांनी उचलून नेल्याचे कळाल्याने त्याचे मित्र तिकडे धावले. त्यांची आरोपींसोबत हाणामारी झाली. यात चार ते पाच जण जबर जखमी झाले. इरफानला रक्ताच्या थारोळ्यात लोळविल्यानंतर आरोपी फरार झाले.ही माहिती कळताच दोन्ही गटातील आणखी गुंड एकमेकांवर हल्ला करण्याच्या तयारीत लागले. ते कळताच कळमना पोलिसांचा ताफा, पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार आपल्या ताफ्यासह तेथे धडकले.पोलिसांचा संशयकल्लोळहत्याकांडानंतर या भागात प्रचंड तणाव निर्माण झाला. पोलिसांनी रात्रभर धावपळ करून आरोपी सचिन प्रकाश माथाडे (वय ३०), कुणाल विलास गोसावी (वय २९), संदीप रमेश पराते (वय २५), अभिनव विलास गोसावी (वय २३), मनोज पुरी (वय २३), आनंद सुधाकर देवघरे (वय ३७), संजय नरहरी चिंचखेडे (वय ४२), नीलेश विजय माथाडे (वय ३६), महेश रामाजी मुळे (वय २८) आणि विजू रामचंद्र बारापात्रे (वय ३०) यांना इरफानची हत्या केल्याच्या आरोपात अटक केली. तर दिलीप आणि इरफानचा मित्र साहिल शहा या दोघांना अभिनव गोसावी तसेच विजू रामचंद्र बारापात्रेवर प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपाखाली अटक केली. इरफानची हत्या दिलीप आणि साथीदारांनी केल्याची सर्वत्र चर्चा आहे. कळमना पोलिसांनी मात्र त्याला इरफानच्या हत्येत अटक न दाखवता दुसऱ्या गुन्ह्यात अटक केल्याने या प्रकरणातील संशयकल्लोळ वाढला आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, ज्यावेळी इरफान रक्ताच्या थारोळ्यात आचके देत होता त्यावेळी त्याच्या मित्रांनी त्याला रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. यावेळी घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी त्याला हात लावू नका म्हणून विरोध केला. तातडीने या एकूणच प्रकारामुळे या भागातील नागरिकांच्या भावना अत्यंत तीव्र झाल्या आहेत.पोलीस आयुक्त, ठाणेदार बेफिकीर !या हत्याकांडामुळे निर्माण झालेल्या स्थितीमुळे पुन्हा काही भानगड होऊ शकते, ही बाब ध्यानात आल्याने पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी संपूर्ण रात्र संबंधितांना योग्य कारवाईच्या सूचना देत होते. सहआयुक्त रवींद्र कदम, उपायुक्त हर्ष पोद्दार हे देखील घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी आरोपींना तातडीने अटक करण्यासाठी रात्रभर पथके कामी लावली. मात्र, कळमन्याचे ठाणेदार विश्वनाथ चव्हाण या थरारक हत्याकांडात बेफिकिरीने वागताना दिसले. मुख्य आरोपी दिलीप गौर याचा हत्येच्या गुन्ह्यात संबंध नसल्याचे चव्हाण सांगत होते. पत्रकारांनी आज दिवसभरात अनेकदा त्यांना फोन करून, प्रत्यक्ष भेटून संपर्क केला. प्रत्येक वेळी ते बाथरूमला जायचे आहे, जेवण करीत आहो, अशी कारणे सांगून घटनाक्रम सांगण्यास टाळाटाळ करीत होते.