लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रोजमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील एका तरुणाची अज्ञात आरोपींनी गुप्तांगावर घाव घालून हत्या केली. गुरुवारी दुपारी ही घटना उघडकीस आल्यानंतर पारडी परिसरात थरार निर्माण झाला.
दिलीप बिसराम राऊत (वय २२) असे मृताचे नाव असून तो गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा गावचा रहिवासी होता, अशी प्राथमिक माहिती चर्चेला आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, दिलीप विवाहित असून काही दिवसांपूर्वीच तो रोजगाराच्या शोधात नागपुरात आला होता. पती-पत्नी रोजमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत होते. गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कापसी पुलाजवळील झुडपात तरुणाचा मृतदेह पडून असल्याचे पोलिसांना कळाले. त्यानंतर पोलिसांचा ताफा तिकडे धावला. डोक्यावर आणि गुप्तांगावर घाव घालून आरोपींनी त्याची हत्या केली होती.
दिलीपचा मृतदेह आरोपींनी फरफटत आणून झुडपात फेकला असावा, असे घटनास्थळाचे चित्र होते. त्याच्या कपड्यात आधार कार्ड मिळाल्याने मृताची ओळख पटली. पोलिसांनी नंतर त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून ही माहिती दिली.
गोंदिया कनेक्शन?
विशेष म्हणजे, हत्येची घटना उघडकीस येऊन ८ ते ९ तास झाले मात्र पारडी पोलिसांकडून पत्रकारांनाच काय माहिती कक्षालाही या संबंधाने सविस्तर माहिती दिली नाही. रात्रीपर्यंत पारडीचे ठाणेदार सुनील गांगुर्डे यांचा मोबाईल प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे या गुन्ह्याची सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. शिवाय ते कोणत्या कामात गुंतले होते, ते पण कळू शकले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, या हत्याकांडाचे गोंदिया कनेक्शन असल्याचा संशय आहे. त्यामुळे आरोपींचा छडा लावण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके गोंदियासह ठिकठिकाणी आरोपींचा शोध घेत होती.