लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुमगाव परिसरात एका ३० वर्षांच्या तरुणाचा गळा आवळून खून करण्यात आला. ही घटना हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी २८ जुलै रोजी उघडकीस आली. दरम्यान, हा खून प्रेम प्रकरणातून झाला असावा, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.
सुखदेव देवाजी विरखडे (३०) रा.नवीन गुमगाव हा तरुण सोमवारी २६ जुलैला घरून निघाला होता. दोन दिवसांपासून तो बेपत्ता असल्यामुळे त्याचा भाऊ त्याचा शोध घेत होता. दरम्यान, बुधवारी २८ जुलैला वागधरा-गुमगावच्या वेणा नदीवरील पाणीपुरवठा योजनेच्या पंप हाउसजवळ त्याचा मृतदेह आढळला. लगेच याबाबत हिंगणा पोलिसांना माहिती देण्यात आली. मृतक तरुणाचे दोन्ही हात दुपट्ट्याने बांधले होते, तसेच त्याच्या गळ्याला दुपट्टा गुंडाळला होता. त्याच दुपट्ट्याचा अर्धा भाग रेलिंगला बांधला होता. गळा आवळून खून केल्यानंतर ही आत्महत्या आहे, असे भासविण्यासाठी त्यास रेलिंगला लटकविण्यात आले असावे, असा पोलिसांना संशय आहे. घटनास्थळी न्यायवैद्यक चाचणीसाठी पथक बोलविण्यात आले. पोलीस उपायुक्त नुरुल हसन, सहायक पोलीस आयुक्त परशुराम कार्यकर्ते, हिंगणाचे निरीक्षक सारीन दुर्गे घटनास्थळी पोहोचले होते. घटनास्थळावर तपास केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. हिंगणा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
गावातील तरुणीशी होते प्रेमसंबंध
खून झालेल्या सुखदेव विरखडेचे गावातील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. तिचे लग्न ठरल्यानंतर तिच्या भावासोबत मृतकाचा चार-पाच दिवसांपूर्वी वाद झाला होता. मुलीच्या भावाला बघून घेण्याची धमकी सुखदेवने दिली. यातूनच हा खून झाला असावा, अशी पोलिसांना शंका आहे. पोलिसांनी दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.