नागपूर : अवघ्या ५०० रुपयासाठी चार भावांनी मिळून दोघांवर प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात एका भावाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे. गोळीबार चौकाजवळ रविवारी रात्री ८.३० ते ९ च्या सुमारास ही थरारक घटना घडली. यामुळे परिसरात काही वेळ प्रचंड तणाव निर्माण झाला होता. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिमकी भागात टोपरेंची विहीर आहे. या विहिरीजवळ आरोपी अश्विन बारापात्रेचे घर आहे. काही अंतरावर दर्शिल निमजे (वय २३) याचेही घर आहे. हे दोघे आणि त्यांचे नातेवाईक रोजमजुरीचे काम करतात. पाच महिन्यांपूर्वी निमजेने बारापात्रेच्या भावाला ५०० रुपये उधार दिले होते. ते परत करण्यासाठी आरोपी बारापात्रे बंधू टाळाटाळ करीत होते. अडचण असल्यामुळे रविवारी रात्री ८.३० च्या सुमारास दर्शिल आणि त्याचा मोठा भाऊ मिथून खेमचंद निमजे (वय २५) हे दोघे ५०० रुपये मागण्यासाठी आरोपीच्या घरी गेले. तेथे त्यांचा वाद झाल्यानंतर आरोपी अश्विन, नीलेश, प्रवीण आणि अजय बारापात्रे या चौघांनी घातक शस्त्रांनी मिथूनवर हल्ला चढवला. त्याला वाचविण्यासाठी धावलेल्या दर्शिलवरही आरोपींनी सपासप घाव घातले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. दर्शिल आणि मिथून रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपी पळून गेले. आजूबाजूच्यांनी या दोघांना मेयोत नेले असता डॉक्टरांनी दर्शिलला मृत घोषित केले तर, मिथूनची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची माहिती कळताच तहसील आणि पाचपावली ठाण्याचा पोलीस ताफा घटनास्थळी धावला. त्यांनी आरोपींची शोधाशोध करीत अश्विन आणि नीलेशला अटक केली. त्यांनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आम्हीच ५०० रुपये निमजेला उधार दिले होते. ते परत मागितले म्हणून त्यांनी आमच्यावर हल्ला केला. त्यातून हा प्रकार घडल्याचे सांगितले. दरम्यान, फरार झालेल्या प्रवीण आणि अजय बारापात्रेचा शोध घेतला जात आहे. नेतागिरी करणाऱ्यांचा गोंधळ महापालिकेची निवडणूक डोळ्यापुढे ठेवून अनेकांनी घटनास्थळी धाव घेऊन तेथे नेतागिरी सुरू केली. आरडाओरड, गोंधळ वाढल्याने तणाव निर्माण झाला. पोलिसांनी नेतागिरी करणाऱ्यांना पद्धतशीर हाताळून प्रकरण निस्तारले. अवघ्या ५०० रुपयासाठी एकाची निर्घृण हत्या आणि दुसऱ्याच्या हत्येचा प्रयत्न झाल्याने परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)
५०० रुपयासाठी तरुणाची हत्या
By admin | Published: January 30, 2017 2:29 AM