लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बंद पडलेल्या मोटरसायकलला सुरू करताना जोरात एक्सिलेटर दाबल्याच्या क्षुल्लक कारणावरून चार आरोपींनी मोटरसायकलस्वाराला भोसकून ठार मारले. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बारसेनगरात गुरुवारी रात्री ११.५५ वाजताच्या सुमारास ही थरारक घटना घडली.सुमीत रामदास ढेरिया असे मृत मोटरसायकलस्वाराचे नाव आहे. तो टिमकीतील संभाजी रोड परिसरात राहत होता. नितीन पांडुरंग शेटे (वय २२) आणि सुमीत हे दोघे मोटरसायकलने गुरुवारी रात्री बारसेनगरातून जात होते. अचानक त्यांची मोटरसायकल बंद पडली. ती सुरूच होत नव्हती. त्यामुळे नितीनने खाली उतरून मोटरसायकलला धक्का दिला तर सुमीतने जोरात एक्सिलेटर दाबले. मोटरसायकल सुरू झाली. ती पुन्हा बंद पडू नये म्हणून सुमीतने रेज केली. त्यामुळे आवाज झाला. यावेळी बाजूला चार समाजकंटक होते. त्यांनी सुमीतला शिवीगाळ केली. त्यातून आरोपींसोबत सुमीतचा वाद झाला. आकस्मिक वादात आरोपींनी चाकू काढून सुमीतला भोसकले. तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर आरोपी पळून गेले. नितीनने मदतीसाठी आरडाओरड केली. त्यानंतर मोठ्या संख्येत बाजूची मंडळी धावली. जखमी सुमीतला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी सुमीतला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. माहिती कळताच पाचपावली पोलीस पोहचले. त्यांनी नितीनच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. आरोपींची चौकशी केली जात आहे.
परिवाराचा आधार गेलासुमित पीडब्ल्यूएस कॉलेजमध्ये बीसीएच्या द्वितीय वर्षांला शिकत होता. त्याच्या परिवाराची आर्थिक अवस्था हलाखीची आहे. वडील टेलर असून आई गृहिणी आहे. त्याला प्रेम नामक भाऊ आणि राधा नामक बहीण आहे. तो घरच्यांना आधार व्हावा म्हणून शिक्षण घेतानाच एका इलेक्ट्रीकच्या दुकानात काम करायचा. मितभाषी असलेल्या सुमितचा कुख्यात गुंडांनी काहीही कारण नसताना बळी घेतला. सुमितच्या जाण्यामुळे त्याच्या परिवाराचा आधार गेला आहे. खतरनाक गुंड मोकाट, पोलीस बघ्यांच्या भूमिकेतशहरातील अनेक खतरनाक गुंडांवर वरिष्ठांनी मोक्का लावला आहे. त्यांना शहराबाहेर हुसकावून गुन्हेगारीवर नियंत्रण लावण्याचा त्यामागे वरिष्ठ पोलीस अधिकाºयांचा हेतू असतो. मात्र, अनेक पोलीस ठाण्यातील अधिकारी वरिष्ठांच्या हेतूला तडा देतात. या हत्याकांडातील आरोपी कुख्यात विशाल मेश्राम हा तडीपार गुंड आहे. त्याने यापूर्वी दोन जीव घेतले आहे. त्याने केलेला हत्येचा हा तिसरा गुन्हा आहे. काही दिवसांपूर्वी त्याला तडीपार करण्यात आले होते. मात्र, तो पाचपावलीतच राहत असून, कॅरम क्लबच्या नावाखाली जुगार अड्डा चालवित आहे. दुसरा आरोपी शुभम खापेकर याने काही दिवसांपूर्वी कळमन्यातील एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केला असता त्याने तिच्यावर अॅसिड हल्ला करण्याची धमकी दिली. तोसुद्धा तडीपार असूनही शहरातच राहत होता, हे या गुन्ह्यातून पुन्हा स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारे अनेक तडीपार गुंड शहरात फिरत असूनही त्यांच्याकडे पोलीस बघे म्हणून बघत असतात. त्याचमुळे सुमितसारख्या तरुणाचा क्षुल्लक कारणावरून बळी गेला आहे. वृत्त लिहिस्तोवर पोलिसांनी या प्रकरणात दोघांना ताब्यात घेतले होते. फरार आरोपींचा पाचपावली पोलीस शोध घेत होते.