नागपूर : बहीण व चिमुकल्या मुलासह पाच जणांची क्रूरपणे हत्या करणारा नररुपी सैतान विवेक गुलाब पालटकर (४२) याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एस. पावसकर यांनी शनिवारी हा निर्णय दिला. मृतांमध्ये कमलाकर मोतीराम पवनकर (४८), त्यांच्या पत्नी अर्चना (४५), आई मीराबाई (७३), मुलगी वेदांती (१२) व भाचा कृष्णा (५) यांचा समावेश आहे.
अर्चना ही आरोपीची बहीण तर, कृष्णा हा मुलगा होता. पवनकर कुटुंब दिघोरीतील आराधनानगर येथे राहत होते. कमलाकर प्रॉपर्टी डिलर होते. तसेच, ते घरीच वैष्णवी इलेक्ट्रिकल्स नावाने दुकान चालवित होते. आरोपी विवेकला पत्नीच्या खूनात जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्याला न्यायालयातून सोडविण्यासाठी कमलाकर यांचे सुमारे पाच लाख रुपये खर्च झाले होते. त्यामुळे कमलाकर आरोपीला पैसे मागत होते.
आरोपी त्याच्याकडे नवरगाव येथे वडिलोपार्जित दहा एकर शेती असतानाही पैसे परत करत नव्हता. त्यावरून दोघांमध्ये घटनेच्या आठ दिवसांपासून वाद सुरू होता. त्यातून आरोपीने ११ जून २०१८ रोजी मध्यरात्रीनंतर संबंधित पाचही जणांचा निर्घृण खून केला. घटनेच्या वेळी आरोपीची मुलगी वैष्णवी (१२) व कमलाकर यांची मुलगी मिताली (१४) या दोघीही घरात होत्या. त्या सुदैवाने बचावल्या. न्यायालयात सरकारतर्फे ॲड. अभय जिकार, फिर्यादी केशव पवनकरतर्फे ॲड. मो. अतिक तर, आरोपीतर्फे ॲड. ऋषिकेश ढाले यांनी कामकाज पाहिले. जिकार यांनी क्रुरकर्मा आरोपीविरुद्ध २९ साक्षीदार तपासले. याशिवाय त्यांनी अन्य विविध पुराव्यांच्या आधारावर आरोपीवरील गुन्हे सिद्ध केले.
हत्याकांडामुळे शहरात थरकाप उडाला
या हत्याकांडामुळे शहरवासीयांचा थरकाप उडाला होता. विवेकने कमलाकर व त्यांच्या कुटुंबियांचा कायमस्वरुपी काटा काढण्याचा कट आखला होता. त्यानुसार, तो रात्री दहा वाजताच्या सुमारास कमलाकर यांच्या घरी गेला. दरम्यान, सर्वांनी सोबत जेवण केले. हॉलमध्ये विवेक व मीराबाई झोपल्या. बेडरुममध्ये कमलाकर, अर्चना, वेदांती व कृष्णा हे झोपले. मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास विवेक उठला. त्याने सैतानासारखे कमलाकर, अर्चना, वेदांती व कृष्णा यांच्या डोक्यावर लोखंडी जड वस्तूने जबर वार केला. त्यामुळे चौघेही बेडवरच ठार झाले. त्यांचा आवाज ऐकून मीराबाई बेडरुमकडे आल्या. विवेकने मीराबाईला पकडून स्वयंपाकघरात नेले व तिलाही डोक्यावर वार करून ठार मारले. त्यानंतर तो लोखंडी गेटवरून उडी मारून पसार झाला.