लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेस्टॉरंटमध्ये वाढदिवसाची पार्टी साजरी करीत असलेल्या विधिशाखेच्या विद्यार्थ्यांवर क्षुल्लक कारणावरून खुनीहल्ला करण्यात आला. रविवारी रात्री अमरावती रोडवरील एका रेस्टॉरंटमध्ये घडलेल्या या घटनेत तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अंशुमन वंजारी नावाच्या आरोपीला अटक केली. त्याचा साथीदार हा या घटनेचा मुख्य सूत्रधार यश गावंडे रा. विश्वकर्मानगर हा फरार आहे. विभास टंकीकर, रुचिर बत्रा आणि अक्षय मोंगलेवार अशी जखमींची नावे आहेत.जखमी युवक हे सौंसर, छिंदवाडा येथील रहिवासी आहेत. ते विधी महाविद्यालय पुणे येथे शिकतात. सोमवारी कोलकाता येथे क्रिकेट सामना असल्याने तो पाहण्यासाठी ते जाणार होते. यासाठी ते रविवारी नागपुरात आले होते. पोलीस सूत्रानुसार रविवारी रहाटे कॉलनी येथील अॅड. अभय घाटोळे यांचा वाढदिवस होता. घाटोळे यांचे परिचित विधिशाखेचे विद्यार्थी ओंकार उमाटे आणि कल्पेश बोरसे यांनी रविवारी अमरावती रोडवरील टी टिंबर ड्रंक बार अॅण्ड रेस्टॉरंट येथे पार्टी ठेवली होती. जखमी विद्यार्थी हे ओंकार व कल्पेशचे मित्र होते. त्यांच्या बोलावण्यावरूनच ते आले होते. त्यांच्यासोबत ओंकारचा मित्र अक्षय मोंगलेवार हा सुद्धा आला होता. रात्री सुमारे १२.३० वाजता जखमी विद्यार्थी मिळून जेवण करीत होते. त्याच वेळी यश गावंडे व अंशुमन वंजारी आपल्या एका मित्रासोबत बारमध्ये आला. यश ओंकार व कल्पेशला ओळखत होता. जखमी विद्यार्थी ओंकार व कल्पेशसोबत बोलत होते. त्याच वेळी यश विद्यार्थ्यांजवळून गेला. तेव्हा कल्पेशने त्याला काहीतरी म्हटले, असा यशला संशय आला. यावरून तो वाद घालू लागला. कल्पेश व त्याच्या मित्रांनी समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु यश काही ऐकायलाच तयार नव्हता. तो कारने आला होता. त्याने कारमधून चाकू काढला आणि रुचिर बत्रावर हल्ला केला. पोटावर आणि छातीवर वार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विभासवर हल्ला केला. अंशुमनने अक्षयला पकडून ठेवले होते. यशने त्याच्यावरही हल्ला केला. या घटनेमुळे खळबळ उडाली. जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अंशुमनला अटक केली.
नागपुरात विधिशाखेच्या विद्यार्थ्यांवर खुनी हल्ला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 11:14 PM
रेस्टॉरंटमध्ये वाढदिवसाची पार्टी साजरी करीत असलेल्या विधिशाखेच्या विद्यार्थ्यांवर क्षुल्लक कारणावरून खुनीहल्ला करण्यात आला. रविवारी रात्री अमरावती रोडवरील एका रेस्टॉरंटमध्ये घडलेल्या या घटनेत तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले.
ठळक मुद्देतिघे गंभीर जखमी