नागपूर विद्यापीठ : ‘शॉर्टटर्म’ कार्यकाळासाठी निवडनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरूपदी कोणाचाही निवड करण्यात येणार नाही, असा दावा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी केला होता. परंतु सोमवारी यासंदर्भात अचानक आश्चर्याचा धक्का देत विद्यापीठाने डॉ. मुरलीधर चांदेकर यांची या पदावर नियुक्ती केली आहे. ‘व्हीएमव्ही’ महाविद्यालयाचे प्राचार्य असलेल्या डॉ. चांदेकर यांच्या ‘शॉर्टटर्म’ निवडीची माहिती विद्यापीठाच्या माध्यम समन्वयकांनादेखील रात्रीपर्यंत नव्हती. यातून विद्यापीठातील अधिकाऱ्यांमध्ये असलेली ‘कम्युनिकेशन गॅप’ अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे. अनुप कुमार यांच्यानंतर डॉ. विनायक देशपांडे यांची प्रभारी कुलगुरू पदावर नियुक्ती झाल्यावर तीन महिन्यांसाठी प्र-कुलगुरू निवडण्याची आवश्यकता नाही, असे संकेत देण्यात आले होते. नियमित कुलगुरू निवडीच्या दिशेने विद्यापीठाने प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, हिवाळी परीक्षा आणि अनेक प्रशासकीय जबाबदारींचा प्रभारी कुलगुरूंवर वाढता ताण बघता, प्र-कुलगुरूंची निवड करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. डॉ. चांदेकर वर्धमाननगर येथील व्हीएमव्ही महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटरवरही ते कुलपतींचे प्रतिनिधी म्हणून नियुक्त आहेत. ते नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या अभ्यास मंडळावर आहेत.(प्रतिनिधी)विद्यापीठात ‘कम्युनिकेशन गॅप’सोमवारी सायंकाळी विद्यापीठात कुलगुरूंच्या दालनात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी प्रभारी प्र-कुलगुरूपदावर डॉ. मुरलीधर चांदेकर यांची राज्यपाल कार्यालयाने निवड झाल्याचा फॅक्स कुलगुरू कार्यालयाला प्राप्त झाला. परंतु विद्यापीठातील इतर अधिकाऱ्यांना याची उशिरापर्यंत माहिती देण्यात आली नव्हती. इतकेच काय विद्यापीठाचे माध्यम समन्वयक डॉ. श्याम धोंड यांनादेखील यासंदर्भात नेमकी माहिती नव्हती. मोठ्या अधिकाऱ्यांमध्येच ‘कम्युनिकेशन गॅप’ असल्यानंतर अगोदरच ‘प्रभारी’भरोसे चालणाऱ्या विद्यापीठाचा कारभार सुरळीतपणे चालणार तरी कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुरलीधर चांदेकर प्रभारी प्र-कुलगुरूपदी
By admin | Published: November 11, 2014 1:00 AM