जागनाथ बुधवारी : असामाजिक तत्त्वांनी बनविला अड्डा गणेश हूड, आनंद डेकाटे । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापलिकेची रुग्णालये अतिशय जुनी झाली आहेत. त्याला दुरुस्तीची गरज आहे. मनपा मात्र नेहमीच पैशाचे रडगाणे गात असते. एकीकडे रुग्णालयाची इमारत व्यवस्थित नाही तर दुसरीकडे इमारत असूनही त्याचा वापर होत नाही, अशी परिस्थिती आहे. जागनाथ बुधवारी येथील मनपा रुग्णालय याचे उत्तम उदाहरण आहे. येथे प्रसूतीगृहासाठी मनपाने दोन माळ्याची प्रशस्त इमारत बांधली होती. परंतु त्याचा कधी वापरच झाला नाही. आज ही इमारत धूळखात पडली असून, ती असामाजिक तत्त्वांचा अड्डा बनली आहे. जागनाथ बुधवारी येथे मनपाचा दवाखाना आहे. रुग्णालयाचा परिसर खूप मोठा आहे. या परिसरात एकूण दोन दवाखाने आहेत. एक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व दुसरा युनानी दवाखाना. ही दोन्ही रुग्णालये खूप जुनी आहेत. बांगलादेश, तांडापेठ, पिवळी मारबत, चुनाओळी, खाटीक मोहल्ला, जागनाथ बुधवारी आदी परिसरातील रुग्ण या दवाखान्याचा लाभ घेतात. याच परिसरात अनेक वर्षांपूर्वी प्रसूतीगृहासाठी इमारत बांधण्यात आली होती. इमारत पूर्ण झाली तरी त्यात प्रसूती विभाग मात्र सुरू होऊ शकला नाही. परिणामी या इमारतीकडे दुर्लक्ष झाले. आज ही इमारत ओसाड पडली आहे. परिसरातील असामाजिक तत्त्वाची मंडळी या इमारतींमध्ये दारू, जुगारासह अनेक अनैतिक कृत्य करीत असतात. सहा बेड असलेले प्रसूतीगृह होणार होते जागनाथ बुधवारी हा गरीब, मध्यमवर्गीय लोकांची वस्ती असलेला परिसर आहे. येथे मनपाचा एकमेव दवाखाना होता. या दवाखान्यात प्रसुतीची सुिवधा असावी म्हणून तत्कालीन आमदार शौकत कुरेशी यांच्या प्रयत्नाने येथे सहा बेडचे प्रसुतीगृह बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रसुतीगृहाची इमारतही बांधून देण्यात आली. परंतु नंतर काय झाले कुणास ठाऊक येथे प्रसुतीगृह सुरूच झाले नाही. इमारत तशीच राहिली. शौचालय व मूत्रीघर म्हणूनही वापर इमारत बेवारस स्थितीत असल्याने परिसरातील नागरिक आणि फुटपाथवरील विक्रेते, व्यापारी, ग्राहक या परिसराचा वापर शौचालय व मूत्रीघर म्हणूनही करतात. त्यामुळे सर्वत्र घाण पसरलेली आहे.
प्रसुतीगृहाची इमारत धूळखात
By admin | Published: May 15, 2017 2:31 AM