लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘सारेगमपा’चा महागायक ठरल्यानंतर अनिरुद्ध जोशी या नावाची महाराष्ट्राला ओळख झाली होती. नागपुरातील त्याच्या संगीत अकादमीने बऱ्यापैकी लोकप्रियता मिळविली होती व तो स्थिरावलाही होता. मात्र आयुष्याचा मोठा कॅनव्हास शोधण्यासाठी हे सर्व सोडून मुंबई गाठली. शून्यापासून संघर्ष क रावा लागणार, याची जाणीव होती. अस्तित्वाची धडपड सुरू असताना शिकणे मात्र सुटले नाही. या संघर्षातही त्याने गानसम्राज्ञी किशोरीताई आमोणकर यांच्याकडे भारावल्यासारखे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. संगीत हे सागराप्रमाणे आहे, ते शिकण्यासाठी आयुष्य अपुरे पडेल, म्हणून त्यातील मोती ज्याप्रकारे शक्य असेल, वेचत राहिले पाहिजे, अशी भावनिक साद प्रसिद्ध गायक अनिरुद्ध जोशी यांनी रसिकांना दिली.एका कार्यक्रमासाठी नागपूरला आलेल्या अनिरुद्ध जोशी यांनी बुधवारी लोकमत कार्यालयात सदिच्छा भेट दिली. यावेळी दिलखुलास गप्पा मारताना, त्यांनी जीवनातील यश, संघर्ष मांडत नवगायकांना मोलाचा संदेश दिला. अनिरुद्ध जोशी हे नाव आज महाराष्टÑातच नाही तर देश-विदेशातही परिचित झाले आहे. पण ही ओळख काही एक-दोन स्पर्धा जिंकल्याने झाले नाही. संगीताबद्दल असलेले समर्पण आणि कठोर साधनेतूनच त्यांनी स्वत:चा ठसा उमटविला आहे. अनिरुद्ध यांनी लहानपणापासूनच शास्त्रीय संगीताचे धडे गिरविले आहेत. किराणा घराण्याचे पं. कैवल्यकुमार गुरव यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले. अप्रतिम अशा शास्त्रीय गायनातून त्यांनी सारेगमपचे विजेतेपदानंतर ‘सूर नवा ध्यास नवा’ या स्पर्धेचे विजेतेपदही पटकाविले. शास्त्रीय गायक म्हणून ओळख असलेल्या अनिरुद्ध यांची सुगम संगीत आणि सर्व प्रकारचे गाणे गाण्याची प्रतिभा जगाला दिसली. २०१४ मध्ये हे सर्व सोडून मुंबई गाठली व पुन्हा नव्याने सुरुवात केली. सहा महिन्याच्या संघर्षानंतर येथे स्वत:चे वर्तुळ निर्माण केले. काही मराठी, हिंदी चित्रपटांसाठी संगीत कम्पोज करण्यासह अनेक दिग्गज गायकांसोबत अल्बम व अनेक चित्रपटांमध्ये गायक म्हणून ठसा उमटविला आहे. यासोबत देशात आणि विदेशातही अनेक गाण्यांच्या कार्यक्रमात त्यांची व्यस्तता वाढली आहे.हे सर्व करताना त्यांच्यात शिकण्याची उत्सुकता कमी झाली नाही. भारतीय अभिजात संगीतच नाही तर सुगम संगीत व पाश्चात्य संगीताचीही आवड असल्याचे त्यांनी सांगितले. चांगले गाणे म्हणण्यासाठी चांगले ऐकण्याची श्रवणभक्ती असणे आवश्यक असल्याने सगळीकडून चांगले काही घेण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.अनिरुद्ध यांनी शास्त्रीय गायनाची फार संधी मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. एखाद्या कार्यक्रमात नाट्यसंगीत व अभंगाची फर्माइश आली की बरे वाटते. असे असले तरी लाईट म्युझिकही तेवढ्यात आवडीने गात असल्याचे त्यांनी सांगितले. वेगवेगळ्या वाहिन्यांवर होणारे गायनाचे रियॅलिटी शो चांगले आहेत, मात्र स्पर्धंकांनी सकारात्मकपणे त्याचा विचार करावा. आपण हरलो म्हणजे सर्व संपले आणि जिंकलो म्हणजे खूप काही मिळविले असे नाही. या स्पर्धांपुरते मर्यादित ठेवल्यास काही हशील होणार नाही. एक-दोन स्पर्धा जिंकल्या व स्टेजवर गायला मिळाले म्हणजे आपण मोठे गायक झालो, असा आव बाळगू नका, असा सावध इशारा त्यांनी नवीन गायकांना दिला.नागपुरात आता संगीत कार्यक्रमांची रेलचेल वाढली आहे. हा सकारात्मक बदल आनंददायक आहे. मात्र स्टेज मिळाला व आपल्याच लोकांचा प्रतिसाद मिळाला तर खूप काही मिळविले, हा भ्रम बाळगला तर पुढचा प्रवासच बंद होईल, असा इशारा त्यांनी दिला. संगीत हे विस्तीर्ण जग आहे. यामध्ये सतत शिकण्याची व परिश्रम करण्याची तयारी ठेवावी लागते. मी आजही पाच तास रियाज करीत असून समर्पणाला पर्याय नाही, असे ते म्हणाले. विविध संस्थांमधून वेळापत्रकानुसार गाणे शिकणे मर्यादित असते. पण शास्त्रीय संगीताचे धडे घेतल्याशिवाय संगीत अपूर्ण असून त्यासाठी गुरुशिवाय पर्याय नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. चांगले गुरू मिळणे आज कठीण झाले आहे, पण त्यांचा शोध घ्या, असे आवाहन त्यांनी केले. नागपूरच्या लोकांनी नेहमीच मला प्रेम दिले आहे. त्यांचे ऋणानुबंध कधीही तुटणार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.