लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुस्लिम समाजाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत फारसे सूर मिळत नसल्याचे चित्र देशातील अनेक ठिकाणी दिसून येते. मात्र सामाजिक समरसतेची मोहीम देशभरात राबवत असलेल्या संघाच्या सेवा प्रकल्पांत सर्व जाती-पंथाच्या नागरिकांना मदतीचा हात दिला जातो. अशाच एका सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून सलिमुन्नीस्सा अली या महिलेच्या पोटच्या मुलीचा आजार दूर झाला अन् तेव्हापासून ती संघाच्या सेवाप्रकल्पांशी कायमची जोडली गेली. मुस्लिम असूनदेखील संघात जातीधर्माला नव्हे तर माणुसकीला स्थान असल्याचे सांगताना ती जराही कचरत नाही. सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्यासमोर ही भावना बोलून दाखवत असताना तिच्या मनातील भाव अश्रूंवाटे समोर येत होते.सलिमुन्नीस्सा या मूळची उत्तर प्रदेशमधील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील तितौली या गावच्या. २१ वर्षांअगोदर त्यांचे कुटुंब नागपुरात स्थायिक झाले. पती अख्तर अली मुंबईत नोकरी करत होते व सलिमुन्नीस्सा दक्षिण नागपुरातील श्रीनगर-रानवाडी भागात राहत होत्या. शहरात फारसे कुणीच परिचित नव्हते. त्यातच मुलगी साबिया अली हिची तब्येत वारंवार खराब व्हायची. उपचार सुरू असतानादेखील मुलीची तब्येत जास्तच बिघडायला लागली.घरची बेताचीच आर्थिक परिस्थिती व त्यातच एकटी महिला अशा स्थितीत सलिमुन्नीस्सा अतिशय घाबरल्या होत्या. त्यांची ही अडचण संघाच्या सेवाप्रकल्पांचे काम पाहणारे वीरेंद्र मल्होत्रा यांना कळाली.मल्होत्रा यांनी तात्काळ जवळच चालविण्यात येत असलेल्या सेवा प्रकल्पांबाबत माहिती दिली व डॉक्टरांची भेट घालून दिली. रात्री २ वाजता सलिमुन्नीस्साच्या अत्यवस्थ मुलीवर डॉ. प्राची पुराणिक यांनी उपचार केले. आपली मुलगी वाचेल की नाही ही चिंता सतावत असताना संघ पदाधिकाऱ्यांनी मला हिंमत दिली आणि सकाळी माझी मुलगी चक्क पायांवर उभी होती.आज या घटनेला अनेक वर्ष उलटली असली तरी तो क्षण डोळ्यासमोरुन जाता जात नाही. आता माझे पती अख्तर अली यांना कर्करोग झाला आहे. त्यांच्या उपचारासाठीदेखील सेवाप्रकल्पातील कार्यकर्ते सातत्याने मदत व मार्गदर्शन करतात, असे तिने सांगितले.
कधीही असुरक्षित वाटले नाहीदेशात अनेक जण असहिष्णुतेबाबत बोलत असले तरी मला मात्र कधीही असुरक्षित वाटले नाही. माझ्या नातेवाईकांनी मला मुस्लिमबहुल भागात राहायला जाण्याचा आग्रह केला. मात्र मला येथे सर्वांचीच आत्मियता मिळाली आहे, असे तिने सांगितले. संघाच्या लोककल्याण समितीच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी सेवाप्रकल्प चालतात. अज़नी भागात आयोजित ‘सेवादर्शन’ कार्यक्रमातदेखील सलिमुन्निसा यांनी आपल्या भावना स्पष्टपणे मांडल्या हे विशेष.