लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : कळमेश्वर-ब्राह्मणी नगर परिषदेने १९८५ साली १ लाख ५० हजार रुपयांमध्ये २ हेक्टर ६६ आर जमीन खरेदी केली. मात्र, त्या जागेचे मालकी हक्क फेरफार केले नाही. नेमका याचाच फायदा घेत मूळ मालकाने त्या जमिनीचा काही भाग दुसऱ्याला परस्पर विकल्याचा प्रकार नुकताच उघड झाला आहे.
कळमेश्वर-ब्राह्मणी नगर परिषदेने विकासकामासाठी सन १९८५ मध्ये २ हेक्टर ६६ आर जमीन खरेदी केली. खरेदी-विक्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पालिका प्रशासनाने त्यावेळी जमिनीचे फेरफार करून त्यावर मालकी हक्काची नाेंद केली नाही. त्यामुळे विक्री झाल्यानंतरही ती जमीन मूळ मालकाच्या नावेच राहिली. ही बाब लक्षात येताच मालकाने पालिका प्रशासनाला सूचना न देता २०२० मध्ये यातील ०.३० आर जागेची परस्पर विक्री केली. ही विक्री झाल्यानंतर प्रकरण उघडकीस आले.
या जागेची विक्री करतेवेळी मालकाने नगर परिषदेचे ना हरकत प्रमाणपत्र देखील घेतले नाही. त्या जागेची विक्री ना हरकत प्रमाणपत्राविना करण्यात आली. दुय्यम निबंधकाने पालिकेच्या ना हरकत प्रमाणपत्राविना विक्री करवून दिल्याने या प्रकरणात त्यांच्याही कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
...
आठ दिवसांअगोदर हा प्रकार उघडकीस आला. आम्ही याबाबत चौकशी करत आहाेत. सिटी सर्व्हेची आखिव पत्रिका मिळाल्याने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करणार आहाेत.
- स्मिता काळे, मुख्याधिकारी,
नगर परिषद, कळमेश्वर ब्राह्मणी
...
सध्या संबंधित फेरफार घेतला नसल्याने याबाबत चौकशी सुरू आहे. चौकशी पूर्ण झाल्यावर याेग्य निर्णय घेऊ. दुय्यम निबंधकांना याबाबत विचारणा केली जाईल.
- सचिन यादव,
तहसीलदार, कळमेश्वर.