दयानंद पाईकराव
नागपूर : सध्या सर्वच रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली आहे. कोचमध्ये पाय ठेवायलाही जागा नसल्याची स्थिती आहे. स्पेशल ट्रेनमध्ये सेकंड सीटर तिकीट घेऊन प्रवासी आरक्षित डब्यातून प्रवास करीत आहेत. अनेक प्रवासी खुशकीच्या मार्गाने रेल्वेस्थानकात प्रवेश करून आरक्षित डब्यात विनातिकीट प्रवास करीत आहेत. त्यामुळे आरक्षित डब्यातील प्रवाशांना मनस्ताप होत आहे. अशा ९३ हजारांवर फुकट्या प्रवाशांवर मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने कारवाई केली आहे.
- सध्या नागपुरातून सुरू असलेल्या स्पेशल ट्रेन
१) ०२१९० नागपूर - मुंबई दुरांतो स्पेशल
२) ०२१५९ नागपूर - जबलपूर स्पेशल
३) ०२१०६ गोंदिया - मुंबई विदर्भ स्पेशल
४) ०११३७ नागपूर - अहमदाबाद स्पेशल
५) ०२०३६ नागपूर - पुणे स्पेशल
६) ०१४०३ नागपूर - कोल्हापूर स्पेशल
७) ०३१७० नागपूर - मुंबई सेवाग्राम स्पेशल
८) ०२०४२ नागपूर - पुणे स्पेशल
९) ०२२२४ अजनी - पुणे स्पेशल
१०) ०२०२५ नागपूर - अमृतसर स्पेशल
- रात्री आणि दिवसाही गर्दी
सध्या नागपूरहून जाणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्यांमध्ये खचाखच गर्दी आहे. सर्वच गाड्यांतील कोचमध्ये पाय ठेवायलाही जागा नाही. दिवसा आणि रात्रीच्या सर्वच गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी बघावयास मिळत आहे.
- ९३ हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई
मध्य रेल्वेच्या नागपूर विभाग आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विनातिकीट प्रवाशांची धरपकड करण्याची मोहीम राबविली. यात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने ५१,००२ फुकट्या प्रवाशांची धरपकड केली. तर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने मागील महिनाभरात ४२,४०० विनातिकीट प्रवाशांवर कारवाई केली. अजूनही काही प्रवासी विनातिकीट प्रवास करीत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून, ज्यांनी दंड भरला नाही, त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात येते.