प्रवीण खापरे
नागपूर : उन्हाळा लागला की रस्त्याच्या कडेला हिरवीगार लिंबे आणि तजेलदार फळांचे ज्यूस विक्रेते कायम आकर्षित करतात. उन्हाचा ताप आणि त्यायोगे कोरडा पडणारा घसा, आपसूकच माणसाला या ज्यूस विक्रेत्यांजवळ थांबण्यास बाध्य करतो. मात्र, हे ज्यूसही आता खिशाला परवडणारे राहिलेले नाही. गेल्या सत्रात १० रुपयाला मिळणारे लिंबू पाणी आताशा २०-२५ रुपयांना, तर ४०-५० रुपयाला मिळणारे अननसाचे ज्यूस ८० ते १०० रुपयांला मिळत आहे. ज्यूसमध्ये बर्फ हवा असेल तर ज्यूसच्या किंमतीतून दहा रुपये कमी केले जात असल्याचे निदर्शनास आले.
ज्यूसचे दर
फळ - गेल्या सत्रातील दर - वर्तमानातील दर
संत्री - २० रुपये - ४० ते ५० रुपये
मोसंबी - २० रुपये - ४० ते ५० रुपये
ॲप्पल - ४० रुपये - १०० रुपये
अननस - ४० रुपये - ८० ते १०० रुपये
ऊस - १५ रुपये - २० ते ३० रुपये
लिंबू पाणी - १० रुपये - २० ते २५ रुपये
लिंबू सरबत - १५ रुपये - २५ ते ३० रुपये
जलजिरा - १५ रुपये - २० ते २५ रुपये
थंड पेयाचे दर
पेय - गेल्या सत्रातील दर - वर्तमानातील दर
लस्सी - २० रुपये - ३० रुपये
ताक/छाछ - १५ रुपये - २५ ते ३० रुपये
दोन वर्षांची गॅप
गेले दोन वर्षे कोरोना संक्रमणात गेले आणि त्या काळात लॉकडाऊनमुळे इतर क्षेत्राप्रमाणे ज्यूस विक्रेत्यांवरही निर्बंध होते. त्यामुळे, गेली दोन उन्हाळे विक्रेत्यांना व ग्राहकांना किमतीचा अंदाजच नव्हता. यंदा कोरोना संक्रमणाचा धोका संपला आणि बाजारमुक्त झाल्याने विक्रेते व ग्राहक बिनधास्त आहेत. त्यामुळे, या किमती वाढलेल्या म्हणाव्या की सुधारलेल्या असा प्रश्न निर्माण होत आहे.
फळांच्या किमती प्रचंड वाढल्या
फळांची आवक कमी झाली म्हणून किमती वाढल्या, असे म्हणणे चुकीचे आहे. बाजारात आवक प्रचंड आहे. मात्र, इंधनाचे दर आभाळाला भिडले आहेत. त्यामुळे, ट्रान्सपोर्टिंगचा खर्चही वाढला आहे. संत्री १२० रुपये किलो, ॲपल दोनशे रुपये किलो, अननस १०० रुपये नग अशा किमती आहेत. तेव्हा ज्यूसच्या किमती कमी कशा राहू शकतील. त्या वाढणारच.
- गोरखनाथ गुप्ता, ज्यूस विक्रेता
...................