देशातील अन्य मेट्रो रेल्वेच्या तुलनेत नागपूर मेट्रो रेल्वे अत्याधुनिक आणि अनोखी तसेच तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम, सुविधायुक्त, सर्वाधिक सुरक्षित आणि इको फ्रेंडली राहणार आहे. प्रारंभीपासूनच मेट्रोतून ३.५० लाख प्रवासी दररोज प्रवास करतील, अशी अपेक्षा आहे. मुंजे चौकात २५ मीटर उंच अद्ययावत व देखणे टॉवर बनणार असून त्यावर रेल्वे धावणार आहे. याशिवाय अंबाझरी तलावावर एक हँगिंग स्टेशन राहील. यावरून प्रवाशांना तलावाचे सौंदर्य निरखून पाहता येईल. ‘माझी रेल्वे’ अशी भावना नागपूरकरांमध्ये निर्माण व्हावी, असा कंपनीचा प्रयत्न आहे. नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी ‘लोकमत’ला शुक्रवारी सदिच्छा भेट दिली. लोकमत समूहाच्या संपादकीय सहकाऱ्यांसोबत संवाद साधताना दीक्षित यांनी प्रकल्पाच्या अनेक महत्त्वपूर्ण पैलूंवर चर्चा केली. दीक्षित यांनी सांगितले की, नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प देशात ‘सर्वश्रेष्ठ’ ठरणार आहे. प्रकल्प सर्वश्रेष्ठ कसा राहील, याची अनेक कारणे त्यांनी दिली. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प तीन वर्षांतच पूर्ण करण्याचा दावा त्यांनी केला. सौर ऊर्जेद्वारे आवश्यक विजेची पूर्तता होणार आहे. कामात दक्ष आणि सकारात्मक विचारसणीसाठी विख्यात असलेल्या बृजेश दीक्षित यांची या प्रकल्पासाठी प्रामुख्याने निवड केली आहे, हे उल्लेखनीय.
माझी मेट्रो जगावेगळी मेट्रो...
By admin | Published: April 05, 2015 2:29 AM