नागपूर : विविध प्रकल्पांवरून श्रेय घेण्याचे राजकारण सुरू झाले असताना समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे. युती शासनाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. कुणी कितीही प्रयत्न केले तरी समृद्धी महामार्गावरून माझे नाव मिटवता येणार नाही, असे ते म्हणाले. मंगळवारी नागपुरात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
समृद्धी महामार्ग सुरू झाला पाहिजे. त्यासाठी मला अतिशय आनंद आहे. घाईघाईत उद्घाटन आटोपले तर मार्ग सुरू होईल, मात्र त्याचे महत्त्व कमी होईल. त्याचे कधीही उद्घाटन झाले तरी मी त्याचे स्वागतच करील. परंतु अद्याप त्याची कामे पूर्ण झालेली नाहीत. ती पूर्ण केल्यावर या मार्गाचे उद्घाटन केले तर ते अधिक चांगले होईल.
संकल्पना २० वर्षांपासून माझ्या डोक्यात होती
समृद्धी महामार्गातून कुणी कितीही प्रयत्न केला तरी माझे नाव त्यातून मिटवता येणार नाही. याचे श्रेय माझे एकट्याचे नाही. जनतेने संधी दिली आणि ही संकल्पना २० वर्षांपासून माझ्या डोक्यात होती. मी ती प्रत्यक्षात आणू शकलो. या मार्गाला जे लोक त्यावेळी मोठ्या प्रमाणात विरोध करत होते, आता तेदेखील या मार्गाच्या उद्घाटनाचा प्रयत्न करत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे, असे फडणवीस म्हणाले.