()
नागपूर : कोरोनामुळे राज्याच्या व्यवस्थांना धक्का पोहोचला आहे. अर्थचक्र कोलमडले आहे. कोरोनावर मात करणारी पुरेशी लस येईपर्यंत विषाणूचा सामना करण्याबरोबरच राज्याच्या प्रगतीला गतिमान करण्याची जबाबदारी लोकसेवक म्हणून राजपत्रित अधिकाऱ्यांची आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने शासन आणि जनतेचा दुवा म्हणून राजपत्रित अधिकाऱ्यांची नवीन कार्यसंस्कृती आखली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने राबविलेले ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या धर्तीवर महासंघाने सर्व अधिकाऱ्यांना ‘माझे कार्यालय माझी जबाबदारी’ ही चळवळ व्यापक करण्याचे आवाहन केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कार्यसंस्कृतीची रचना करताना काही दशसूत्री आखल्या आहे. या दशसूत्रीनुसार १०० टक्के प्रामाणिकतेने उत्कृष्ट कार्यक्षमता साध्य करणे व महाराष्ट्र घडविण्यासाठी योगदान सर्व अधिकाऱ्यांनी देणे अपेक्षित आहे. या दशसूत्रीचा अंगीकार करीत कोरोना विरुद्ध लढाईत आघाडीचे सैनिक होण्याचे आवाहन महासंघाने केले आहे. महासंघाने यासाठी महाराष्ट्राच्या उभारणीसाठी नवीन कार्यसंस्कृती या आशयाने एक मार्गदर्शनात्मक पत्रक तयार केले आहे. हे पत्रक महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या माध्यमातून सोशल मीडियाद्वारे व्हायरल करण्यात येत आहे. सोबतच नव्या कार्यसंस्कृतीचा अंगीकार करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
- याकडे विशेष कटाक्ष ठेवा
१) कार्यालयीन संस्कृतीत मास्कला अविभाज्य भाग बनवू या.
२) पंतप्रधान, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या आवाहनानुसार ‘दो गज दूरी’चे पालन करून ‘माझे कार्यालय, माझी जबाबदारी’ निभवू या.
३) नागरिकांचे कोरोनापासून संरक्षण ही प्राथमिकता ठेवा.
४) घरी, कार्यालयात वावरताना स्वच्छता, सॅनिटायझेशनला प्राधान्य द्या.
५) कार्यालयातील कर्मचारी व सहकाऱ्यांना मास्क, सुरक्षित अंतर, स्वच्छतेची प्रेरणा देण्यासाठी स्वत:चा आदर्श निर्माण करा.
- काही कार्यालयीन सुधारणा करा
१) कार्यालयातील कार्यपद्धती सुलभ व पारदर्शक करा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा.
२) जनतेला प्रत्यक्ष कार्यालयात येणाची आवश्यकता पडणार नाही, कमीत कमी वेळात काम होईल, यासाठी कामात गती आणा.
३) लाभाच्या योजनांची चेकलिस्ट संकेतस्थळावर व कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावा.
४) आपण जी नोकरी करतो आहोत, ती शासनाकडून वेतन घेऊन समाजाची सेवा करण्याची संधी आहे, ही भावना ठेवा.
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेली ही नवीन कार्यसंस्कृती महासंघाचे मुख्य संस्थापक व सल्लागार ग. दी. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस विनायक लहाने यांच्या मार्गदर्शनात तयार करण्यात आली आहे. या मार्गदर्शक सूचना आहेत, त्याचा अंगीकार प्रत्येक राजपत्रित अधिकाऱ्यांनी करायच्या आहे.
डॉ. कमलकिशोर फुटाणे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ