गोपालकृष्ण मांडवकरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे रस्ते बंद पडलेले. मोजक्या मालवाहू वाहनांची वाहतूक सुरू असल्याने अडकलेले कामगार जमेल तसे प्रवासाला लागलेले. अगदी जीवावर उदार होऊन ! तर पैसा नसल्याने कुणी पायी चाललेले. रस्त्यात प्रचंड हाल. अशातच गावच्या कामगार युवकांची चेन्नईमध्ये परवड चाललेली. मुरादाबादला राहणाऱ्या महम्मद अझीमचे मन द्रवले. त्याने रोजा सोडला. ट्रक घेऊन थेट चेन्नई गाठले अन् अडकलेल्या गावच्या ६५ कामगारांना घेऊन तो मुरादाबादकडे निघाला. रमझानच्या पवित्र महिन्यात हातून सत्कार्य घडले. तो कृतार्थ झाला अन् म्हणाला, ‘यही है मेरी इबादत!’उत्तर प्रदेशातील मुरादाबाद भागातून पोटापाण्यासाठी गेलेले २५ ते ३० वयोगटातील तरुण लॉकडाऊनमध्ये चेन्नईत अडकून पडले होते. यातील कुणी कटिंग सलूनच्या दुकानात कामाला होते. कुणी कंत्राटी कामावर ठेकेदाराच्या हाताखाली राबत होते. परंतु कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे हातमजुरी थांबली. यामुळे त्यांना पैशाची चणचण भासायला लागली. पूर्ण काम करूनही ठेकेदाराने पुरेशी मजुरी दिली नाही. होता तो पैसा दोन वेळच्या खाण्यात संपला. प्रवासाला लागणारे पैसेही कुणाकडे नव्हते. नेमक्या याच दिवसात महम्मदच्या कानावर २,१९४ किलोमीटरवरील चेन्नईत अडकलेल्या गावच्या कामगारांची बातमी पोहचली. त्याला आपल्या मित्रांचे दु:ख कळले. रमझानचा पवित्र महिना सुरू असल्याने त्याचे रोजे सुरू होते. या पवित्र महिन्यात केलेल्या रोजांमधून शरीर व मनाची शुद्धी होते. आपल्या हातून कल्याण घडावे, अशी प्रार्थना अल्लाकडे केली जाते. महम्मदने आपला उपवास थांबवला. अल्लाची इबादत केली. चेन्नईला ट्रक घेऊन गेला आणि ६५ तरुणांना घेऊन मुरादाबादला निघाला.मुरादाबाद येथील महम्मद अझीम या युवकाने संकटकाळात केलेली ही मदत आणि जपलेला माणुसकीचा भाव या काळामध्ये कौतुकाचा ठरला आहे. या परतीच्या प्रवासात दीनबंधूच्या मदत केंद्रावर त्याची भेट झाली. जेवणासाठी हे सर्वजण उतरल्यावर त्यांच्याशी केलेल्या चर्चेतून ही कहाणी पुढे आली. महम्मद म्हणाला, अडकलेल्या या तरुणांमध्ये हिंदू, हरीजन, मुस्लीम सारेच आहेच. आम्ही मनाच्या आणि शरीराच्या शुद्धीसाठी आणि पवित्रततेसाठी रमजानचे रोजे करतो. 'मेरे रमझान को और रोजे को अल्लाने कुबूल किया. मै मेरे भाईयोंको मदत कर रहा हूं. कुरान की यही सच्ची शिक्षा है. यही तो सच्चा इस्लाम है. '
पाणावलेले डोळे आणि सत्काराची शालमहम्मदच्या या संवेदनशीलतेने दीनबंधूच्या केंद्रावरील सारेच भारावून गेले होते. या कार्याचा गौरव करण्यासाठी शाल देऊन त्याचा सत्कार केला तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. ते तरुण म्हणाले, हा सत्कार आणि अन्नदानाची सेवा आम्ही आयुष्यभर विसरणार नाही. कोरोनाच काय, अशा हजारो संकटावर आम्ही माणुसकीच्या धर्माने मात करू. ही आपुलकी जगण्याला नवी ऊर्जा देईल.