आॅपरेशनसाठी हवे अडीच लाख रुपये : पैशाअभावी मायबाप हतबलनागपूर : दोन वेळेच्या पोटापुरते कमावून, सुखी समाधानाने जीवन जगणाऱ्या दाम्पत्याच्या आयुष्यात एका गोंडस मुलाने जन्म घेतला. तो जन्मास आल्याच्या दुसऱ्याच दिवसापासून मायबापाचा संघर्ष सुरू झाला. कारण बाळाच्या हृदयात जन्मत:च दोन छिद्र आहे. डॉक्टरांनी बाळाला जगवायचे असेल तर सहा महिन्यांचा अवधी मायबापाला दिला. त्याच्या आॅपरेशनला अडीच लाख रुपये खर्च येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पैशाअभावी मायबाप हतबल झाले आहे. सरकारी रुग्णालयाच्या उपचारात तीन महिने निघून गेले आहेत. एवढा पैसा आणायचा कुठून, या चिंतेने मायबापाची झोप उडाली आहे.रामेश्वरी परिसरातील रामटेके नगरात राहणाऱ्या श्रावण व दीपाली गेडाम या दाम्पत्याच्या घरात मानस नावाच्या बाळाने जन्म घेतला. श्रावण हा खासगी वाहनावर ड्रायव्हर म्हणून काम करतो आहे. घरात एकमेव कमावता असलेल्या श्रावणवर आई व पत्नीबरोबरच आता बाळाचीही जबाबदारी आली आहे. सहा हजार रुपये महिन्यात घरातील कुटुंबाचे पोट तो भरत होता. बाळाच्या येणाच्या आनंदाने घरातील सर्वजण आनंदी होते. मायबापाने तो जगात येण्यापूर्वी स्वप्नही रंगविले होते. तीन महिन्यांपूर्वी मेडिकलमध्ये त्याचा जन्म झाला. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता, त्याच्या हृदयात दोन छिद्र असल्याचे सांगितले. या धक्क्याने श्रावण आणि दीपालीचा आनंदच हिरावून गेला. मेडिकलमध्ये त्याचे उपचार सुरू झाले. परंतु मुलाच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने, त्यांनी खासगी हृदयरोग तज्ञ्जाकडे त्याला दाखविले. त्या डॉक्टरांनी मानसची तपासणी करून आॅपरेशन करण्याचा सल्ला दिला. तसेच सहा महिन्याची लाईफ लाईन दिली. या आॅपरेशनसाठी अडीच लाख रुपये खर्च येणार असल्याचे सांगितले. हलाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या गेडाम कुटुंबीयांना अडीच लाख रुपये जमा करणे, डोईजड झाले आहे. वडील श्रावण मित्रांच्या मदतीने लोकप्रतिनिधींच्या घरचे उंबरठे झिजवितो आहे. कुठूनतरी बाळाच्या उपचारासाठी मदत होईल, यासाठी त्याची तगमग सुरू आहे. अद्यापतरी त्याच्या हाती निराशाच आली आहे. येणारा प्रत्येक दिवस या मायबापाला वेदना देणारा ठरत आहे. बाळाचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. बाळाच्या आजारामुळे घरचे वातावरण त्रासिक झाले आहे. (प्रतिनिधी)मानसला मिळेल का मदतीचा हात४मानसला होणाऱ्या वेदना, त्याच्या आईवडिलांना बोचत आहे. पोराचे रडण थांबता थांबत नसल्याचे बघून नवराबायकोचे डोळे पाणावले आहे. मानसच्या वेदनांना फुंकर घालण्यासाठी समजाकडून मदतीचा हात हवा आहे. या चिमुकल्याच्या जगण्याला बळ देण्यासाठी गुणीजनांनी पुढे येण्याची गरज आहे. मानसला मदत करायची असेल तर ९५५२२४८०७० या क्रमांकावर संपर्क साधता येईल. तसेच बँक आॅफ महाराष्ट्र, नरेंद्र नगर शाखेत ६८०१४६५९४९६ या खात्यातही मदत करू शकता.
चिमुकल्याला जगविण्यासाठी मायबापाचा संघर्ष
By admin | Published: October 30, 2015 3:13 AM