नागपूर : रक्तातील साखरेचे योग्य व्यवस्थापन आणि काळजी घेतल्यास म्युकरमायकोसिसच्या धोक्याला दूर ठेवता येऊ शकते. म्युकरमायकोसिस हा संसर्गजन्य आजार नाही. त्यामुळे घाबरून जाऊ नये. हा रोग वातावरणातून शरीरात येतो. मधुमेह असलेल्या किंवा कोरोनाच्या उपचारादरम्यान मधुमेह झाला, अशांना म्युकरमायकोसिस होण्याचा अधिक धोका असतो. शरीरात तीन ठिकाणी याची लक्षणे आढळतात. दातांमध्ये, नाकातून सायनसमध्ये नंतर डोळ्यांमध्ये आणि मेंदूमध्ये हा विकार आढळून येतो. यात दात हे प्रथम लक्ष्य असते. दातांना यामुळे प्रचंड वेदना होऊ शकतात, अशी माहिती विदर्भ कान, नाक, घसा संघटनेचे अध्यक्ष व म्युकरमायकोसिसच्या टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. प्रशांत निखाडे यांनी दिली.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘म्युकरमायकोसिस’ आजाराबाबत शुक्रवारपासून लोकजागृती अभियानाला सुरुवात झाली. या आजाराची लक्षणे व प्रतिबंधात्मक उपायांबद्दल डॉ. निखाडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर उपस्थित होते. या अभियानात कोरोना विषाणू, कोरोनानंतर घ्यावयाची काळजी, म्युकरमायकोसिस आजार व घ्यावयाची दक्षता तसेच तिसऱ्या संभाव्य लाटेसंदर्भात वैद्यकीय सेवेची उपलब्धता यावर तज्ज्ञाकडून आशा वर्कर, प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी - कर्मचारी तसेच जनतेसाठीसुद्धा विविध माध्यमांद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे.
- लक्षणे दिसताच डॉक्टरकडे जा
डॉ. निखाडे म्हणाले, म्युकरमायकोसिसचा संसर्ग झाल्यास नाक बंद होते. तो सायनसमध्ये जास्त पसरल्यास डोळ्याने अंधुक दिसू लागते आणि नंतर याचा संसर्ग मेंदूमध्ये झाल्यास फिट्स येतात. काळ्या बुरशीला आवर घालण्यासाठी रुग्णालयांनी रोज रुग्णाची रक्तशर्करा चाचणी करावी. रुग्णालयातून सुटी झाल्यावरही आहाराचे काही नियम पाळणे रुग्णाला गरजेचे आहेत. मातीकाम करणाऱ्या शेतकऱ्यांना या बुरशीचा धोका जास्त आहे. त्यामुळे पावसाळ्यात शेतात काम करताना शेतकऱ्यांनी मास्क, हातमोजे घालणे गरजेचे आहे. महत्त्वाचे म्हणजे, कोणतेही लक्षण अंगावर काढू नका. तातडीने डॉक्टरांकडे जा, असे आवाहनही डॉ. निखाडे यांनी केले.