काकांचा हत्येचा आरोप : शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण अस्पष्टनागपूर : गोव्यात पिकनिकसाठी गेलेल्या हरसाहेबसिंग हरपालसिंग बावेजा (वय २४) याचा संशयास्पद मृत्यू हत्येचाच प्रकार असल्याचा आरोप हरसाहेबचे काका इंदरसिजतसिंग बावेजा यांनी लावला आहे. दरम्यान, हरसाहेबचा शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण स्पष्ट न झाल्याने या प्रकरणाचे रहस्य अधिकच वाढले आहे. बवेजा परिवार शहरातील नामवंत व्यावसायिकांपैकी एक आहे. कडबी चौकात त्यांचे निवासस्थान आहे. सेंट्रल एव्हेन्यूवरील हॉटेल आमिरचे संचालक इंदरजीतसिंग बावेजा हे मृत हरसाहेबचे काका आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी हरसाहेब मुंबईला शिकायचा. नंतर त्याने रायसोनीत लॉचे शिक्षण पूर्ण केले. सहा महिन्यांपासून तो कुटुंबीयांना व्यवसाय सांभाळण्यास मदत करीत होता. गौरांग संदीप जैन, समर्थ विजय बजाज, आयुष दीपक भारद्वाज (सर्व रा. नागपूर) आणि रोहित गुप्ता (लुधियाना) या मित्रांसोबत पिकनिकसाठी गोव्याला जातो, असे सांगून हरसाहेब २४ डिसेंबरला घरून निघाला. २८ डिसेंबरला सकाळी गौरांगसोबत झुडपी डोंगरात ट्रॅकिंग करीत असताना हरसाहेब बेपत्ता झाल्याची तक्रार पेरनेम ठाण्यात त्याच्या मित्रांनी नोंदवली. त्यामुळे पोलिसांनी शोधाशोध करतानाच हरसाहेबच्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानुसार, बवेजा कुटुंबीय २९ डिसेंबरला गोव्यात पोहचले. हरसाहेबचे मित्र, कुटुंबीय आणि गोवा पोलीस तब्बल तीन दिवस शोधाशोध करीत होते. ३१ डिसेंबरला अखेर हरसाहेबचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत अरंबोल टापूजवळ आढळला. त्यामुळे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
हरसाहेबसिंगच्या मृत्यूचे गूढ वाढले
By admin | Published: January 03, 2016 3:21 AM