नागपूर : चिखली येथील पुलावर बुधवारी मिरची व्यापाऱ्याच्या २० लाख रुपयांच्या दरोड्याचे कोडे उलगडले आहे. ज्या कर्मचाऱ्याने तीन अज्ञात आरोपींनी लुटल्याचा कांगावा केला होता व पोलिसात तक्रार दिली होती, तोच या लुटीमागचा सूत्रधार निघाला. आश्चर्याची बाब म्हणजे त्याने सर्व रोकड दुचाकीच्या हेडलाईटमध्ये लपविली होती. गुन्ह्यांवर आधारित वेबसिरीजमधून त्याने हा कट रचल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कळमन्यातील मिरची व्यापारी महेश सहजवानी यांनी त्यांचा कर्मचारी सिद्धार्थ रामटेके याला जरीपटक्यातील नियमित वाहतूकदाराला देण्यासाठी २० लाखांची रोख रक्कम दिली. मोपेडवरून पैसे घेऊन जात असताना अचानक पाऊस सुरू झाला. त्यामुळे रेनकोट घालण्यासाठी रामटेके कळमना पुलावर थांबल्यावर मागून आलेल्या तिघांनी अडविले व २० लाखांची रोकड असलेली बॅग घेऊन पोबारा केला अशी पोलिसात तक्रार करण्यात आली.
रक्कम मोठी असल्यामुळे गुन्हे शाखेने तपास सुरू केला. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर व चौकशीदरम्यान सिद्धार्थने दिलेल्या माहितीवरून पोलिसांना दरोड्याच्या घटनेचाच संशय आला. त्यामुळे पोलिसांनी कळमना येथील सहजवानी यांच्या कार्यालयातून तपास सुरू केला. पोलिसांना सीसीटीव्हीच्या माध्यमातून सिद्धार्थचा 'मार्ग' शोधला. तो दुचाकीवरून रमणा मारुतीकडे जाताना दिसला. तेथे ना त्याचे इलेक्ट्रिकचे दुकान आहे. तेथे अडीच ते तीन तास घालवल्यानंतर तो सहजवानी यांना दरोड्याची माहिती देण्यासाठी पोहोचला. यानंतर सिद्धार्थने लुटीचा बनाव रचल्याचा पोलिसांना संशय आला. सुरुवातीच्या चौकशीत सिद्धार्थने इन्कार केला, परंतु पोलिसी खाक्या पडताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
दोन ठिकाणी लपविली रोकड
पोलिसांनी सिद्धार्थला अटक करून त्याच्याकडून १९ लाख ७६ हजार रुपये जप्त केले आहेत. सिद्धार्थने हेडलाईटमध्ये ११.७६ लाख तर दुकानात ८ लाख रुपये लपविले होते. सिद्धार्थकडे ५० हजारांचे २० बंडल होते. तर पॅक केलेले पाच बंडल देण्यात आले होते. हेडलाईट उघडून दुचाकीमध्ये पैसे ठेवण्याचे तंत्र त्याला आधीच समजले होते. त्याने नोटांचे बंडल हेडलाइटमध्ये ज्या पद्धतीने लपवले होते, त्यामुळे पोलीसही क्षणभर चक्रावून गेले.
वेबसिरीजच्या कथेतून रचला कट
सिद्धार्थने काही काळाअगोदर इलेक्ट्रिक उत्पादनांची एजन्सी घेतली होती. लॉकडाऊनच्या काळात त्याचे काम ठप्प झाले. त्यामुळे सिद्धार्थला आर्थिक नुकसान झेलावे लागले. तो सहजवानींसोबत सात वर्षांपासून काम करतो. दररोज मोठी रक्कम लोकांना दिली जाते. सहजवानींना त्याच्यावर विश्वास होता. आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी सिद्धार्थने लुटीचा बनाव केला. यूट्यूबवर गुन्ह्यांवर आधारित वेब सिरीज पाहून त्याने दुचाकीच्या हेडलाइटमध्ये पैसे लपवण्याचा कट रचला व त्यानुसार तो रमणा मारुती येथील त्याच्या दुकानात गेला.