नागपूर : सायबर गुन्हेगाराने सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या खात्यातून साडेचार लाख रुपये ऑनलाईन वळते करून घेतले. ५ नोव्हेंबरला घडलेल्या या प्रकरणाची तक्रार मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या सायबर सेलने त्याचा तपास केला. त्यानंतर गुरुवारी सीताबर्डी पोलीस ठाण्यात फसवणूक तसेच माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.विकास श्रीधर शिरपूरकर (वय ७२) हे निवृत्त न्यायाधीश धरमपेठमधील देवालय, खरे टाऊन येथे ते राहतात. त्यांच्या मोबाईलवर ५ नोव्हेंबरला सकाळी एका मोबाईलवरून फोन आला. पलिकडून बोलणाऱ्याने मी एसबीआयच्या दिल्ली मुख्यालयात व्यवस्थापक आहे. आपले नाव राकेश वर्मा आहे, असे त्याने सांगितले. तुमचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड एक्स्पायर होत आहे. त्यामुळे नवीन कार्ड मिळवण्यासाठी माहिती सांगा, असे म्हणत आरोपीने त्यांच्याकडून कार्डची संपूर्ण माहिती घेतली. त्यानंतर शिरपूरकर यांच्या मोबाईलवर ओटीपी नंबर आला. तो विचारून शिरपूरकर यांच्या विविध बँक खात्यातून आरोपीने ४ लाख, ४९ हजार, ७६० रुपये काढून घेतले.शिरपूरकर यांच्या तक्रारीनंतर सीताबर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नि. न्यायमूर्तींच्या खात्यातून साडेचार लाख लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 5:32 AM