नागपूर : शहरातील लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट टेक्नालाॅजी (एलआयटी) ने नॅशनल एसेसमेंट ॲण्ड एक्रेडीशन काॅन्सिल (नॅक) च्या स्वतंत्र मूल्यांकनात माेठे यश प्राप्त केले आहे. प्रमुख रसायन इंजिनिअरिंग आणि तंत्रज्ञान संस्थेला नॅकतर्फे ३.४८ कम्युलिटिव्ह ग्रेड पाॅइंटसह ‘ए प्लस’ प्रमाणपत्र प्रदान करण्यात आला.
‘ए प्लस’ ग्रेड प्राप्त झाल्याने देशातील महत्त्वाच्या ७ उच्च शिक्षण संस्थांमध्ये एलआयटीचा समावेश झाला आहे. एलआयटीचे संचालक डाॅ. राजू मानकर यांनी लवकरच संस्थेतर्फे स्वायत्त संस्थेचा ईजा मिळण्यासाठी अर्ज करण्यात येणार असल्याचे लाेकमतशी बाेलताना सांगितले.
आतापर्यंत राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठासाेबत एलआयटीचे मूल्यांकन केले जायचे. मात्र यावेळी पहिल्यांदा संस्था स्वतंत्र नॅक मूल्यांकनाला सामाेरे गेली हाेती. नव्या नियमानुसार महाविद्यालयांना स्वतंत्र मूल्यांकन करायचे आहे. आता संस्था स्वायत्त संस्थेचा दर्जा प्राप्त करण्यासाठी पात्र ठरली आहे. त्यामुळे आम्ही यूजीसीकडे स्वायत्त संस्थेसाठी अर्ज करणार आहाेत. यूजीसीकडून मंजुरी मिळाल्यानंतर आम्ही सरकारशी संपर्क करू, असे डाॅ. मानकर यांनी स्पष्ट केले.
नॅकद्वारे ग्रेड प्रदान करण्यापूर्वी ९६ पॅरामीटर्सच्या आधारे संस्थांचे मूल्यांकन करण्यात आले. सातत्यपूर्ण प्लेसमेंट रेकॉर्ड, उच्च प्रभावाच्या जर्नल्समध्ये संशोधन प्रकाशन, पुस्तकांचे प्रकाशन, सल्लागार आणि हाती घेतलेले संशोधन प्रकल्प आदींचा पॅरामीटर्समध्ये समावेश आहे. आयआयआयटी इम्फालचे संचालक प्रा. के. भास्कर यांच्या अध्यक्षतेतील नॅक टीमने पहिल्या टप्प्यात एलआयटीच्या कामकाजाचे विस्तृत अध्ययन केले व मूल्यांकनासाठी १७ व १८ ऑगस्टला एलआयटीला भेट दिली. पतियाळाच्या थापर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालाॅजीचे डाॅ. एच. भुनिया आणि आंध्र विद्यापीठ, विशाखापट्टनमचे डाॅ. एन. के. इंजेती हे नॅक टीमचे सदस्य हाेते. डाॅ. मानकर यांच्या मार्गदर्शनात एलआयटीच्या अंतर्गत गुणवत्ता सेलने सेल्फ स्टडी रिपाेर्ट (एसएसआर), डेटा पडताळणी व सत्यापन प्रक्रिया व नॅक समितीच्या भेटीदरम्यान कठाेर परिश्रम केले.
- कॅम्पस प्लेसमेंट : एलआयटीमध्ये २०२१-२२ या सत्रात कॅम्पस प्लेसमेंटमध्ये १२८ विद्यार्थ्यांना जाॅब मिळाला. २०२०-२१ या सत्रात संस्थेच्या ८३ विद्यार्थ्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संस्थामध्ये प्लेसमेंट मिळाली.
- संशाेधन प्रकल्प : एलआयटीमध्ये मागील ५ वर्षांत शासकीय व अशासकीय असे २५ संशाेधन प्रकल्प सादर केले.
- संशाेधन पेपर : २०२०-२१ या सत्रात एलआयटीकडून ३९ संशाेधन पेपर सादर करण्यात आले.
अभिनंदन साेहळा आज
नॅककडून (ए प्लस) प्रमाणपत्र प्राप्त झाल्याबद्दल एलआयटी संस्थेकडून गुरुवारी अभिनंदन साेहळा आयाेजित करण्यात आला आहे. दुपारी चार वाजता एलआयटीमध्ये हा कार्यक्रम हाेणार असून, यावेळी राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. सुभाष चाैधरी, प्र-कुलगुरू डाॅ. संजय दुधे, एलआयटीच्या आयक्युएसीचे संचालक डाॅ. प्रतिभा अग्रवाल, एलआयटीचे संचालक डाॅ. राजू मानकर, आदी उपस्थित राहतील.