नागपूर : विदर्भातील ३८ पैकी २९ नगरपंचायतींचा निकाल बुधवारी जाहीर झाला. ४९३ जागांपैकी काँग्रेसने मुसंडी मारत १७२ जागा मिळवत 'बाहुबली'चा मान मिळविला. ११६ जागांवर विजय मिळवित भाजप दुसऱ्या स्थानी राहिला. राष्ट्रवादीकडे ६७, शिवसेनेकडे ४८, अपक्ष ४३ आणि इतर पक्षाचे ४३ उमेदवार विजयी झाले.
अमरावती जिल्ह्यातील २ नगरपंचायतीच्या ३४ जागांपैकी १३ जागांवर विजय मिळवत काँग्रेसने दबदबा निर्माण केला. दोनपैकी एका नगरपंचायतीवर काँग्रेसने, तर एका नगरपंचायतीवर युवा स्वाभिमानने बहुमत मिळविले. भाजपला मात्र २ जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेना ७ जागांवर राहिली. तर युवा स्वाभिमानने ९ जागांवर विजय मिळविला.
चंद्रपूर जिल्ह्यातील ६ नगरपंचायतीच्या १०२ जागांपैकी ५३ जागा काँग्रेसला मिळाल्या. यात मंत्री विजय वडेट्टीवार, खा. बाळू धानोरकर यांचा मोलाचा हातभार राहिला. त्यामानाने माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या भाजपकडे २४ जागाच आल्या. राष्ट्रवादी ८ आणि शिवसेनेला ८ जागांवर समाधान मानावे लागले. यासोबतच २ जागा वंचितकडे आणि ५ जागा गोडवाना गणतंत्र पक्षाच्या ताब्यात आल्या. तेथे नगरपंचायतीवर काँग्रेसने एकहाती या सत्ता मिळविली.
गोंदियात ३ नगरपंचातीच्या ५१ जागांपैकी १० जागांवर भाजप, १३ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस, १० जागांवर काँग्रेसचा विजय झाला. सोबतच २ जागा शिवसेना आणि ७ जागांवर अपक्षाने बाजी मारली.
वर्धा जिल्ह्यातील ३ नगरपंचातीच्या ६८ जागांवर २१ काँग्रेसकडे, २० भाजपकडे, ४ राष्ट्रवादीकडे, २ शिवसेना, १६ अपक्ष आणि ५ इतर पक्षांचा समावेश आहे. इतर पक्षांमध्ये बसपा, शेतकरी संघटनेचा समावेश आहे. २ नगरपंचायतीवर काँग्रेसला बहुमत मिळाले. एका ठिकाणी महाविकास आघाडीचा प्रयोग बहुमत करण्यात आला. एका नगरपंचायतीत त्रिशंकू स्थिती आहे.
यवतमाळ जिल्ह्यात ३९ जागा काँग्रेसकडे आल्या. ४ राष्ट्रवादी, १३ भाजप, २५ शिवसेना, १२ अपक्ष आणि नऊ इतर विजय पक्षाच्या उमेदवारांचा समावेश आहे. इतर पक्षांमध्ये ४ जंगोम, ३ मनसे, १ वंचित आणि १ प्रहारच्या उमेदवाराचा समावेश आहे. यवतमाळातील ६ पैकी एका नगरपंचायतीवर काँग्रेस, तर ५ ठिकाणी त्रिशंकू स्थिती आहे.
नागपूर जिल्ह्यातील २ नगरपंचायतीच्या ३४ जागांपैकी काँग्रेस ८, राष्ट्रवादी ९, भाजप १३, शिवसेना १, अपक्ष ३ उमेदवार विजयी झाले. भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी एक एक नगरपंचायतीवर बहुमत मिळाले. बुलडाण्यातील २ नगरपंचातींच्या ३४ जागांपैकी १६ जागा काँग्रेस, १ राष्ट्रवादी, ५ शिवसेना आणि १२ प्रहारचे उमेदवार विजयी झाले. तेथे एका ठिकाणी काँग्रेस, तर दुसऱ्या ठिकाणी प्रहार जनशक्तीला बहुमत मिळाले.
वाशिममील एका नगरपंचातीच्या १७ जागांपैकी १४ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने मुसंडी मारली. काँग्रेसचे २ आणि भाजपच्या एका उमेदवाराचा विजय झाला. सत्ता काँग्रेसने मिळविली.
२९ पैकी किती नगरपंचायती कुणाकडे?
११ - काँग्रेस
४ - राष्ट्रवादी काँग्रेस
५ - भाजप
१ - युवा स्वाभिमान
१ - प्रहार जनशक्ती
६ - त्रिशंकू
१ - महाविकास आघाडी
काँग्रेस प्रदेशाध्यक्षाच्या जिल्ह्यात तिन्ही नगरपंचायती हातून गेल्या
भंडारा जिल्ह्यातील नगरपंचायतीत भाजप वरचढ ठरत ३ पैकी २ नगरपंचायतींवर ताबा मिळविला. राष्ट्रवादी काँग्रेसकडे १ नगरपंचायत आली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा गृहजिल्हा असलेल्या भंडाऱ्यात मात्र, काँग्रेसचीच पिछेहाट झाली. त्यांना एकाही नगरपंचायत ताब्यात घेता आली नाही. ५१ पैकी २४ जागांवर भाजप, १४ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळविला. तर, काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर राहिली. त्यांच्या पदरात केवळ १० जागा पडल्या. ३ अपक्ष उमेदवार विजयी झाले.