नागपूर : जिल्ह्यातील हिंगणा नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला धक्का देत भाजपाने दमदार विजय मिळविला आहे. कुही नगरपंचायतीत कॉंग्रेसला एकहाती सत्ता मिळविता आली नसली तरी अपक्ष उमेदवाराच्या बळावर कॉंग्रेसचा सत्तेचा मार्ग सुकर झाला आहे.
बुधवारी हिंगणा आणि कुही नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. तीत १७ सदस्यीय हिंगणा नगरपंचायतीत भाजपाला ९, राष्ट्रवादी-५, शिवसेना-१ आणि दोन अपक्ष उमेदवारांचा विजय झाला.
२०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत येथे राष्ट्रवादीला ११ तर भाजपाला ६ जागावर यश मिळाले होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री रमेश बंग यांना धक्का देत आ.समीर मेघे यांनी बाजी मारली. येथे भाजपाच्या तीन जागा वाढल्या तर राष्ट्रवादीच्या ६ जागा कमी झाल्या आहेत.
हिंगण्यात पश्चिम नागपूरचे आ.विकास ठाकरे, जि.प.सदस्या कुंदा राऊत, बाबा आष्टणकर यांच्या बळावर कॉंग्रेसने स्वबळाचा नारा दिला होता. मात्र तो यशस्वी होवू शकला नाही. हिंगण्यात कॉंग्रेसला खातेही उघडता आले नाही. कुही नगरपंचायतीच्या १७ पैकी ८ जागावर कॉंग्रेसने विजय मिळविला आहे. येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपाला प्रत्येकी ४ जागा मिळाल्या तर एका वॉर्डात अपक्ष उमेदवार विजय झाला. येथे अपक्ष उमेदवाराच्या बळावर कॉंग्रेसचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रवादीचा दोन वॉर्डात निसटता पराभव झाला अन्यथा कुहीत सत्तेच्या चाव्या राष्ट्रवादीकडे निश्चितच गेल्या असत्या. राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीमुळे हा फटका बसला.
कुहीत गतवेळी कॉंग्रेसचा ८, भाजपा-५, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष असे प्रत्येक एक नगरसेवक विजयी झाले होते. यावेळी कुही कॉंग्रेसचा ग्राफ वाढला नसला तरी त्यांनी गतवेळच्या जागा कायम राखल्या आहे. आ.राजू पारवे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. राष्ट्रवादीचा गड उमरेड विधानसभा क्षेत्राचे प्रभारी विलास झोडापे यांनी लढविला. यात राष्ट्रवादीला गतवेळपेक्षा तीन जागा अधिक जिंकता आल्या.
अंतिम निवडणूक निकाल असे
हिंगणा नगरपंचायतएकूण जागा - १७भाजपा - ९राष्ट्रवादी कॉंग्रेस- ५कॉंग्रेस- ००शिवसेना - १अपक्ष - २
कुही नगरपंचायत एकूण जागा - १७कॉंग्रेस - ८राष्ट्रवादी- ४भाजपा - ४शिवसेना - ००अपक्ष- १