नागपूर : कोराडी रोडवरील प्रादेशिक वनविभागाच्या जमिनीवर ‘नगर वन उद्यान’ उभारणीचे काम सुरू झाले आहे. ही २१.७५ हेक्टर जमीन नारा डेपो म्हणून ओळखली जातो. या योजनेला केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली असून यावर ६ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. नारा डेपोच्या या क्षेत्रामध्ये सुमारे २०० हरणांचा अधिवास आहे. हे लक्षात घेऊन हरणांना चरण्यासाठी व जल स्रोतांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. येथील हरणे बरेचदा भटकून कोराडी रोड, नारा गाव तसेच परिसरातील वस्त्यांमध्ये जातात. गावातील कुत्र्यांच्या हल्ल्यात ते जखमी होतात. यामुळे संपूर्ण क्षेत्राला फेन्सिंग करून सुरक्षा प्रदान केली जात आहे. यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासही मदत मिळेल, अशी अपेक्षा आहे. या सोबतच, नगर वन उद्यानात नेचर ट्रेन, योग व ध्यान साधना मंच, वनफुलांचे उद्यान, औषधी वनस्पती आणि दुर्मिळ रोपटी लावली जातील. लहान मुलांसाठी पार्क उभारले जाईल.
...
विदर्भातील पहिले उद्यान
जिल्ह्याचे उपवनसंरक्षक डॉ. प्रभुनाथ शुक्ल म्हणाले, अशा प्रकारचे हे विदर्भातील पहिले उद्यान असेल. या जागेवर महाराष्ट्र वन विकास महामंडळाचा डेपो होता. १९९० मध्ये ही जमीन प्रादेशिक वनविभागाकडे हस्तांतरित करण्यात आली. या क्षेत्रात वन्यजीवांचा अधिवास आहे. सध्या चारही बाजूंनी मानवी वस्ती असल्याने याला नगर वन उद्यान बनविण्याचा प्रस्ताव आखण्यात आला.
...