आजपासून सुरू होणारी नागद्वार यात्रा स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 12:15 AM2019-07-25T00:15:30+5:302019-07-25T00:17:15+5:30
मध्य प्रदेशच्या पचमढी येथे गुरुवार, २५ जुलैपासून सुरू होणारी नागद्वार यात्रा प्रशासनाने पावसाअभावी काही दिवसांसाठी स्थगित केली आहे. पाऊस आल्यानंतरच पुढील तारीख निश्चित करण्यात येणार असल्याचे प्रशासकीय महादेव यात्रा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यासंदर्भात २५ जुलैला प्रशासनाची बैठक होणार आहे. पावसामुळे नागद्वार यात्रा स्थगित करण्याची कदाचित पहिलीच वेळ आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्य प्रदेशच्या पचमढी येथे गुरुवार, २५ जुलैपासून सुरू होणारी नागद्वार यात्रा प्रशासनाने पावसाअभावी काही दिवसांसाठी स्थगित केली आहे. पाऊस आल्यानंतरच पुढील तारीख निश्चित करण्यात येणार असल्याचे प्रशासकीय महादेव यात्रा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यासंदर्भात २५ जुलैला प्रशासनाची बैठक होणार आहे. पावसामुळे नागद्वार यात्रा स्थगित करण्याची कदाचित पहिलीच वेळ आहे.
या यात्रेसाठी विदर्भातील ८० टक्के शिवभक्त जातात. त्यात सर्वाधिक भाविक नागपूरचे असतात. यात्रेसाठी भाविकांची महिन्यापूर्वीच तयारी सुरू असते. याशिवाय नागपुरातील अनेक मंडळाचे पदाधिकारी यात्रेकरूंना सेवा देण्यासाठी या ठिकाणी हजर असतात. सध्या अनेक मंडळाचे पदाधिकारी धर्मशाळेत थांबले आहेत. यावर्षी पावसाने दगा दिल्यामुळे शिवभक्तांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
अनेक वर्षांपासून नागपंचमीनिमित्त पचमढी येथे नागद्वार मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. सातपुडा पर्वतरांगांमध्ये अत्यंत दुर्गम भागात नागद्वार स्वामीचे मंदिर आहे. भाविक तीन पर्वतांची १५ कि़मी. परिक्रमा करून मंदिरात दर्शन घेतात. पण यावर्षी पाऊस नसल्यामुळे पर्वतावरून वाहणाºया नद्या कोरड्या आहेत. धूपगड येथील गणेश मंदिराजवळील आणि पश्चिम द्वार येथील नदी कोरडी आहे. भाविकांना धूपगड येथे जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पाऊस नसल्यामुळे भाविकांना पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भणार आहे. भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये आणि पिण्याचे मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, याकरिता मध्य प्रदेश शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी नागद्वार यात्रा क्षेत्राची पाहणी केली. पाण्याअभावी या भागात आजार पसरू शकतात, या शक्यतेने प्रशासनाने यात्रा स्थगित केल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रशासकीय महादेव यात्रा समितीने सेवा आणि यात्रेसाठी येणाऱ्या नागद्वार सेवा मंडळाला पचमढीत येण्यास प्रतिबंध लावले आहेत.