कमलेश वानखेडे
नागपूर :नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले यांनी भाजपचे नागो गाणार यांना धक्का देत मोठे परिवर्तन घडविले. गाणारांची भिस्त सर्वाधिक मतदार असलेल्या नागपूर शहरावर होती; पण त्यांचा अंदाज ‘फेल’ ठरला. तर चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया व वर्धा या पाचही जिल्ह्यांत अडबाले यांनी ‘मेरिट’ची मते मिळवली. त्यामुळेच एकतर्फी मोठा विजय मिळविण्यात अडबाले यांना यश आले.
मतमोजणीदरम्यान सर्व जिल्ह्यातील मतपत्रिका एकत्र करण्यात आल्या. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यात जास्त फटका किंवा आघाडी मिळाली, हे ठामपणे सांगणे कठीण आहे. मात्र, निकालानंतर शिक्षक संघटनांनी घेतलेल्या माहितीनुसार अडबाले सर्वच जिल्ह्यांत आघाडीवर राहिले. नागपूर जिल्ह्यात १३,४२० मतदान झाले. यापैकी नागपूर शहरात ८ हजार तर ग्रामीणमध्ये ५ हजार मतदान झाले होते. नागपुरात झालेले बंपर व्होटिंग गाणारांना तारणार, असा दावा भाजपकडून केला गेला. मात्र, गाणार येथे अपेक्षित आघाडी घेऊ शकले नाहीत. भाजपची नेत्यांची टीम व अख्खी यंत्रणा नागपुरात राबली. मात्र, शिक्षकांचे मन वळवू शकली नाही. उलट नागपूर शहरात अडबाले सामना बरोबरीत सोडविण्यात यशस्वी झाले व नागपूर ग्रामीणमधून सुमारे ७० टक्के मते घेत आघाडीवर राहिले.
गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांत ८० टक्क्यांवर मतदान अडबाले यांना मिळाल्याचा अंदाज आहे. या दोन जिल्ह्यात अडबाले हे थेट शिक्षकांच्या संपर्कात होते. गोंदिया व भंडारा जिल्ह्यात त्यांना ६० टक्क्यांवर मते मिळाली. येथे भाजपच्या प्लॅनिंगला शिक्षक मतदारांनी चकवा दिला. वर्धा जिल्ह्यात भाजपला अपेक्षित असलेली मतविभागणी झाली नाही.
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे माजी आ. विश्वनाथ डायगव्हाणे यांनी घातलेली भावनिक साद कामी आली. एकूणच गाणार यांच्या गाडीला भाजपचे इंजिन लागूनही नागपूर शहर वगळता पाचही जिल्ह्यांत गाणार यांची गाडी धावलीच नाही.
शेवटच्या दिवसात झाडे माघारले
शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे हे गेल्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमाकांवर होते. यावेळी काँग्रेस पाठिंबा देईल, या आशेवर ते राहिले. काँग्रेसने शेवटच्या क्षणापर्यंत झाडे यांना झुलवत ठेवले व शेवटी अडबाले यांना पाठिंबा दिला. महाविकास आघाडीचे उमेदवार होताच अडबाले यांची गाडी समोर सरकत गेली. तर झाडे त्याच गतीने माघारले. झाडे यांची भिस्त संघटनेसोबतच तेली समाजाच्या मतांवर होती; पण या निवडणुकीत जातीचे कार्ड फारसे चाललेले नाही. शिवाय झाडे यांना मत दिल्यास गाणार निवडून येतील, असा धोका शिक्षक मतदारांना वाटला व त्यामुळे अनेकांनी इच्छा असूनही झाडे यांना साथ दिली नाही.
काँग्रेसच्या एकजुटीचा परिणाम
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस एकसंध लढली तेव्हा विजय खेचण्यात यश आले. नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस नेत्यांनी एक दिलाने काम केले. त्याचा फायदा झाला. अमरावती पदवीधर मतदारसंघाचा उमेदवार ठरविण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत राणी कोठी येथे बैठक झाली तेव्हा काँग्रेस नेत्यांनी एकमताने धीरज लिंगाडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. लिंगाडेही विजयी झाले. काँग्रेस एकजुटीने लढली तर मतदारांवरही प्रभाव पडतो, हे या निमित्ताने सिद्ध झाले आहे.