लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : म्युकरमायकोसिसच्या उपचारात प्रभावी असलेले ‘अॅम्पोटेरीसीन बी’चे ११५० इंजेक्शन शासकीयसह खासगी रुग्णालयांना गुरुवारी उपलब्ध करून देण्यात आले. पहिल्यांदाच हजारावर इंजेक्शनचा साठा उपलब्ध झाला आहे. परंतु म्युकरमायकोसिसचे ४३९ रुग्ण उपचाराखाली असल्याने त्या तुलनेत हा ५० टक्केच साठा आहे. असे असलेतरी, त्यात गंभीर रुग्णांना मदत होईल, असे बोलले जात आहे.
म्युकरमायकोसिसवरील रुग्णांवर तातडीने शस्त्रक्रिया व औषधोपचार न झाल्यास हा आजार वेगाने पसरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परंतु नागपूर जिल्ह्यात या आजाराचे रुग्ण आढळून येऊन दीड महिन्याचा कालावधी होत असताना ‘अॅम्पोटेरीसीन बी’चा तुटवडा अद्यापही कायम आहे. रुग्णालयात शस्त्रक्रिया होत आहेत परंतु औषधी मिळत नसल्याने रुग्णसेवा अडचणीत आली आहे. २२ मेपासून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यामार्फत शासकीयसह खासगी रुग्णालयांना या इंजेक्शनचे वितरण केले जात आहे. परंतु एक दिवसा आड त्यातही वाटपात घोळ होत असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये प्रचंड रोष व्याप्त होता. गुरुवारी ११५० इंजेक्शनचे वितरण करण्यात आल्याने मात्र, काहीसा दिलासा मिळाला आहे. नियमित इंजेक्शन उपलब्ध व्हावे व खासगी रुग्णालयांनी हे इंजेक्शन बाहेरून विकत आणण्यास सांगू नये, अशी मागणी त्रस्त नातेवाइकांनी केली.
या हॉस्पिटलला मिळाले इंजेक्शन
मेडिकलला २३७, मेयोला १०४, शा. दंत रुग्णालयाला २४, अॅलेक्सिस हॉस्पिटलला २९, अर्नेजा हॉस्पिटलला २४, आर्युश हॉस्पिटलला २९, सीम्स हॉस्पिटलला १६, क्रिटिकल हॉस्पिटलला १०, गंगा केअर हॉस्पिटलला १६, गॅस्ट्रो व्हिजन हॉस्पिटलला १८, एचसीजी हॉस्पिटलला १३, कल्पवृक्ष हॉस्पिटलला २४, कानफाडे हॉस्पिटलला १६, किंग्जवे हॉस्पिटलला ९७, लता मंगेशकर हॉस्पिटलला १०, निती गौरव हॉस्पिटलला १०, न्युरॉन हॉस्पिटलला ४५, न्यू इरा हॉस्पिटलला ४२, ऑरेंज सिटी हॉस्पिटलला ५५, सेवन स्टार हॉस्पिटलला ३९, सनफ्लॉवर हॉस्पिटलला १३, तांबे हॉस्पिटलला १३, विवेका हॉस्पिटलला १०, तर वोक्हार्ट हॉस्पिटलला १६ इंजेक्शन देण्यात आले. याशिवाय, तीन व पाच इंजेक्शन वितरित केलेल्या काही रुग्णालयांचाही यात समावेश आहे.