- योगेश पांडे नागपूर - १७ वर्षीय विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याच्या पालकांना दोन लाख रुपये खंडणीची मागणी करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात तांत्रिक तपासाच्या माध्यमातून चार अपहरणकर्त्यांना अटक करत मुलाची सुटका केली. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
दीप आनंद गुरव (१७, पंचवटीनगर) असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. तो अकराव्या वर्गात शिकतो. शुक्रवारी रात्री तो नातेवाईकांकडे गेला होता. त्याच वेळी आरोपींनी त्याला फोन करून त्याला बोलाविले. घरी जाताच दीपने मोबाईल ठेवला आणि आरोपींना भेटण्यासाठी एनआयटी गार्डन परिसरात गेला. आरोपींनी शिवीगाळ करीत त्याला बळजबरीने दुचाकीवर बसविले आणि यशोधरानगर परिसरातील एका घरी घेऊन गेले. तेथे त्याला त्यांनी चाकूचा धाक दाखविला. दीपचा मोबाईल घरीच होता. रात्री साडेनऊ वाजता एका आरोपीने दीपच्या मोबाईलवर फोन केला व ‘तुमच्या मुलाचे अपहरण झाले आहे. मुलगा सुखरुप पाहिजे असल्यास दोन लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल.
कोणालाही सांगितल्यास तुमच्या मुलास ठार करेल’ अशी धमकी दिली. हे ऐकून त्याची आई कविता या घाबरल्या व त्यांनी पतीला कळविले. त्यांनी थेट यशोधरानगर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी दीपचा मोबाईल तपासला असता त्यावर ९७३०३९२७९५ या क्रमांकावरून फोन आल्याचे दिसून आले. पोलिसांनी तो मोबाईल ट्रेस केला. त्याच्या लोकेशनवरून पोलिसांनी आरोपींचे स्थळ गाठले व त्यांना अटक केली. आरोपींनी पोलीस येत असल्याचे पाहताच दीपला सोडले. दीप सुखरुप होता व त्याला पालकांच्या हवाली करण्यात आले. आकाश लोनारे (२२, इंदिरामाता नगर), विनीत उर्फ प्रणय खोब्रागडे (२०, एनआयटी गार्डन, धम्मदीपनगर), गौरव मिश्रा (२९, पिवळीनदी) आणि विक्की दिघोरीकर (२४, वनदेवी झोपडपट्टी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
शॉर्टकट कमाईसाठी उचलले अपहरणाचे पाऊलचारही आरोपी मित्र आहेत. त्यापैकी प्रणय हा शिक्षण घेत आहे. ते नेहमीच एनआयटी गार्डनमध्ये बसतात. १५ दिवसांपूर्वी सायंकाळी गार्डनमध्ये बसले असताना कमी वेळात अधिक पैसा कमविण्यासाठी त्यांनी अपहरण करण्याचा कट रचला. त्यांनी परिसरातच एक खोली भाड्याने घेतली. दीप प्रणयच्या घराजवळच राहतो व त्याच्याविषयी त्यांना कल्पना होती. आरोपींनी त्याला फोन करून त्याच्याशी अकारण वाद घालत त्याला बोलण्यासाठी बोलविले होते. अपहरणाच्या पैशांतून पिस्तुल किंवा एखादे शस्त्र विकत घेण्याचा विचार आरोपी करत असल्याची माहिती अटकेतील एका आरोपीने पोलिसांना दिली.