लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २४ बाय ७ योजना राबविणारे नागपूर हे देशातील पहिले शहर आहे. सध्या पेंचमध्ये पाण्याची अडचण आहे. मात्र शहराला मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी त्यादृष्टीने व्यवस्था उभारण्यात येत आहे. पुढील उन्हाळ्यापर्यंत नागपुरात २४ तास पाणी उपलब्ध होईल, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी केले. एकता नगरजवळील जयहिंद सोसायटी येथे आयोजित सभेदरम्यान ते बोलत होते.यावेळी मंचावर माजी खासदार दत्ता मेघे, बरिएमंच्या नेत्या अॅड.सुलेखा कुंभारे, मनपाचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी, रमेश मानकर, नगरसेवक अविनाश ठाकरे, विशाखा मोहोड, जयश्री वाडीभस्मे, संदीप गवई, रिपाइंचे राजू बहादुरे, रमेश भंडारी प्रामुख्याने उपस्थित होते. मागील पाच वर्षांत नागपूरचे चित्र बदलले आहे. झपाट्याने विकास होत असून ‘मेट्रो’ शहर अशी उपराजधानीची ओळख निर्माण झाली आहे. याहून पुढे जात ‘ब्रॉडगेज मेट्रो’ ही वर्धासारख्या शहरांपर्यंत जाणार आहे. त्यामुळे तेथून नागपूरला येण्यासाठी अवघी ३५ मिनिटे लागणार आहेत. अजनी रेल्वेस्थानक हे जगातील सर्वात सुंदर व मोठे रेल्वेस्थानक राहणार आहे. क्रीडा, शिक्षण, दळणवळण, पायाभूत सुविधा, रस्ते, सांस्कृतिक क्षेत्र सर्वच बाबींचा विकास झाला आहे. नागपूर जगातील सर्वात चांगले शहर झाले पाहिजे, असा मानस आहे, असे गडकरी यावेळी म्हणाले.विदेशातदेखील केले कामदेशात दळणवळणाच्या क्षेत्रात १७ लाख कोटींच्या कामाचे वाटप झाले आहे. मात्र जनतेच्या पाठिंब्यामुळे विदेशातदेखील काम करण्याची संधी मिळाली. इराणमध्ये चाबहार येथे अत्याधुनिक बंदर बांधण्यात आले. तर बांगलादेशमध्ये अडीचशे कोटी खर्च करून जलमार्ग तयार करण्यात आला. याशिवाय भारत, भूतान, बांगलादेश, नेपाळ यांना जोडणारे रस्ते व पूल बांधण्याचे कामदेखील सुरू असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली.विकास हेच राजकारणाचे ध्येय हवेमी जात, पंथ, धर्म इत्यादींच्या राजकारणाला मानत नाही. विकास हेच ध्येय असले पाहिजे व विकासाच्या कामात राजकारण व्हायला नको. जनप्रतिनिधींनी पाच वर्षांच्या कामाचा हिशेब जनतेला दिलाच पाहिजे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.मानवी शोषण समाप्त झाल्याचे समाधानआपल्या देशात सायकल रिक्षांचे प्रस्थ होते. मात्र माणसाने माणसांना ओढणे हे एकप्रकारचे शोषणच होते. ‘ई रिक्षा’ आल्यामुळे सायकलरिक्षा चालकांचे कष्ट संपले व ते ‘ई रिक्षा’चालक झाले आहे. देशात एक कोटीच्या वर ‘ई रिक्षा’ चालक आहे. माझ्या कार्यकाळात मानवी शोषण समाप्त झाल्याचे मोठे समाधान आहे, अशी भावना नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.‘बुुद्धिस्ट सर्किट’चे काम वेगातभगवान गौतम बुद्ध यांच्याशी निगडीत असलेल्या जागांना जोडणाऱ्या ‘बुद्धिस्ट सर्किट’चे काम वेगाने सुरू आहे. अनेकांना यावर विश्वास बसत नव्हता. मात्र तेथे गेलेल्या बौद्ध भिख्खूंनी याला दुजोरा दिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. यामुळे देशासोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवरून लोक बुद्ध तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी जास्त प्रमाणात पुढाकार घेतील, असे गडकरी म्हणाले.राष्ट्रीय कार्यात जैन बांधव अग्रेसरदरम्यान, शनिवारी नितीन गडकरी यांनी इतवारी येथील अहिंसा भवन येथे आयोजित जैन समाज स्नेहमिलन कार्यक्रमात उपस्थिती लावली. जैन बांधवांची सौहार्दपूर्ण वागणूक निश्चितच अनुकरणीय आहे. देशात कुठलेही नैसर्गिक संकट आले तर मदतीचा हात पुढे करणाऱ्यांमध्ये जैन बांधव मोठ्या संख्येने पुढे असतात. भगवान महावीर यांच्या विचारांचा वारसा घेऊन समाजामध्ये विविध क्षेत्रात काम करणारे जैन बांधव ही संस्कृती सातत्याने जपतात हे अधोरेखित करण्यासारखे आहे. राष्ट्रीय कार्यामध्ये जैन बांधव अग्रेसर असतात, असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. या संमेलनाला आ. गिरीश व्यास,आ. विकास कुंभारे, प्रफुल्ल दोशी, मनीष मेहता, नरेश पाटनी, संतोष पेंढारी, नरेंद्र कोठारी, अनिल पारख , सुमित लल्ला, सुभाष कोटेचा, पंकज भन्साली, राजेंद्र प्रसाद वैद, अजय वैद्य, निखिल कुसुमगर, सुरेंद्र लोढा, गणेश जैन, दिलीप राका प्रामुख्याने उपस्थित होते