सुमेध वाघमारे
नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जवळपास ९५ टक्के रुग्णांना ऑक्सिजन लागले. तब्बल ४० टक्क्याने ऑक्सिजनच्या मागणीत वाढ झाली होती. यामुळे तिसरी लाट आल्यास दर दिवसाला ४०० मेट्रिक टन ऑक्सिजन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तसे नियोजन केले जात आहे.
कोरोनाची दुसरी लाट भयावह ठरली. मेच्या तिसऱ्या आठवड्यापासून ते एप्रिल महिन्यापर्यंत रुग्णालयात बेड मिळणे कठीण झाले होते. एका रुग्णाला दर मिनिटाला कमीत कमी १० तर जास्तीत जास्त ७० लिटरपर्यंत ऑक्सिजन लागत होते. १७८ मेट्रिक टनपर्यंत ऑक्सिजनची मागणी वाढली होती. परिणामी, मोठा तुटवडा पडला होता. इतर राज्यातून ऑक्सिजन पुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली. तातडीने ऑक्सिजन उपलब्ध होण्यासाठी विमान व रेल्वेसेवेचीही मदत घ्यावी लागली. सध्या कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट आल्याने नागपूर जिल्ह्यात शासकीय व खासगी रुग्णालये मिळून दररोज २० ते २५ मेट्रिक टन ऑक्सिजन लागत आहे; परंतु संभाव्य तिसरी लाट आल्यास ४०० मेट्रिक टनापेक्षा जास्त ऑक्सिजन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ऑक्सिजन साठवणुकीसाठी जम्बो टँक
ऑक्सिजन प्लॅनिंग समिती टास्क फोर्सच्या सदस्य डॉ. वैशाली शेलगावकर यांनी सांगितले, ऑक्सिजनची साठवणूक करण्यासाठी प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या परिसरात लिक्विड ऑक्सिजन असलेला १२५ मेट्रिक टनचा जम्बो टँक उभारण्यात आला आहे. शिवाय दर दिवसाला १५० मेट्रिक टनचे ऑक्सिजनचे उत्पादन होण्यासाठी सावनेर व उमरेड येथे ‘क्रायोजनिक जनरेशन प्लांट’ उभारले जात आहे. हवेतून ऑक्सिजन (पीएसए) काढण्यासाठी एम्स, मेयोमध्ये प्रत्येकी ३ तर मेडिकलमध्ये ४ असे १० प्लांट तयार केले जात आहेत. यातील ५ प्लांट हे ‘१०० एनएम ३’चे आहेत. याची क्षमता १६०० लिटर प्रतिमिनिट ऑक्सिजनची आहे. तर उर्वरित ५ प्लांट हे ‘२०० एनएम ३’चे आहेत. याची क्षमता ३२०० लिटर प्रति मिनीट ऑक्सिजनची आहे.
अडीच पटपेक्षा जास्त ऑक्सिजनचे नियोजन
कोरोनाची दुसरी लाट अधिक तीव्र होती. त्या दरम्यान दरदिवसाला १७८ मेट्रिक टन ऑक्सिजन लागले होते. संभाव्य तिसऱ्या लाटेत याच्या अडीच पट ऑक्सिजनचे नियोजन केले जात आहे. त्यानुसार ४०० व त्यापेक्षा जास्त मेट्रिक टनपर्यंत ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
-डॉ. वैशाली शेलगावकर, सदस्य टास्क फोर्स, ऑक्सिजन प्लॅनिंग समिती