लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उच्च शिक्षणासाठी भारत सरकारकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचे सांगून एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला सायबर गुन्हेगारांनी ८१ हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली.सत्यम नीलेश महाकाळकर असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो गिट्टीखदान येथील न्यू जागृती कॉलनीमध्ये राहतो. तो औरंगाबाद येथील एका महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. लॉकडाऊन झाल्याने तो गावाला परतला होता. या दरम्यान २६ एप्रिलला त्याला मोबाईलवरून दोन कॉल आले. आमच्या संस्थेदरम्यान आणि भारत सरकारदरम्यान एक करार झाला असून त्यानुसार, गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना उच्च तांत्रिक शिक्षणासाठी अर्थसाहाय्य करण्याचे ठरल्याचे त्यांनी सांगितले. या प्रक्रियेत संबंधित विद्यार्थ्याच्या फोन पे खात्यावर रक्कम जमा केली जाते, असे या व्यक्तींनी सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सत्यमने आरोपींना आपल्या एसबीआय बँंकेतील खात्याबद्दल माहिती सांगितली. या आधारावर आरोपींनी सत्यमच्या खात्यावरील ८१ हजार रुपये काढून घेतले.हा प्रकार लक्षात आल्यावर सत्यमने गिट्टीखदान पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी ठगबाजी आणि आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
नागपुरात उच्च शिक्षणाच्या नावाखाली ८१ हजारांनी गंडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 12:38 AM